
वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : तालुक्यात पूर्ण झालेल्या कामांची सुमारे २०० कोटी रुपयांची बिले शासनाकडे थकीत असल्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यामुळे नवीन मंजूर झालेली २५० कोटी रुपयांची विकासकामे रखडली असून, याचा थेट फटका तालुक्यातील नागरिकांना बसत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण आणि मालेगाव अंतर्गत देवळा तालुक्यात गेल्या काही वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा योजना, शैक्षणिक इमारती आणि जलसंधारण यांसारखी अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. ही कामे पूर्ण करूनही त्यांची बिले अनेक महिन्यांपासून थकीत आहेत. त्यामुळे कंत्राटदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
कंत्राटदार संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, ही कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी स्वतःकडील भांडवल वापरले आहे. तसेच, त्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्जही घेतले आहे. बिले वेळेवर न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, बँकेचे हप्ते आणि बांधकाम साहित्याचे पैसे देणे कठीण झाले आहे.
प्रतिक्रिया : “आम्ही शासनाच्या विश्वासावर कामे हाती घेतली आणि वेळेत पूर्ण केली. मात्र, बिले मिळत नसल्याने आमच्यावर मोठे आर्थिक ओझे आले आहे. बांधकाम साहित्य पुरवठादारांनी उधारी देणे बंद केले असून, बँकांकडून कर्जासाठी दबाव वाढत आहे. त्यामुळे नवीन मंजूर झालेली कामे सुरू करण्यास आम्ही असमर्थ आहोत.” — महेंद्र पाटील (कंत्राटदार)



