वेगवान नाशिक /किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.३ ऑगस्ट :- कोळगाव ते देवगाव दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने अखेर कोळगाव येथील शेतकरी व देवगाव रस्त्यावरील नागरिकांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. गेले २५ वर्षे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी प्रशासनाकडे सातत्याने करूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी आजपासून (२ ऑगस्ट) ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली.
आज सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या उपोषणाला प्रारंभ करण्यात आला. महिलांचा आणि लहान मुलांचा देखील मोठा सहभाग असून रस्त्याच्या लवकरात लवकर डागडुजीचे काम सुरू व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शेतमाल वाहतूक, विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास, आरोग्य सेवा आणि पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत गरजांवर या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे आता रस्ता डागडुजीशिवाय पर्याय नसल्याचे ठाम मत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केले.
या उपोषणाला कोळगाव येथील भीम स्टार मित्र मंडळ, आरपीआय निफाड तालुका, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती, अमोल दादा फाऊंडेशन, हिंदू महादेव कोळी संघटना यांसह विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. कोळगाव व देवगाव रस्त्यालगतचे अनेक नागरिक उपोषणात सहभागी झाले असून, शासनाने तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
उपोषणात सहभागी नागरिक
या साखळी उपोषणात केदारनाथ घोटेकर, वाल्मिक गवळी, वैभव चंद्रभान घोटेकर, योगेश घोटेकर, अरुण वाघ, राहुल वाघ, संजय जगताप, शांताराम शिंदे, संदीप घोटेकर, जितेंद्र घोटेकर, ईश्वर गवळी, शरद वाघ, रविंद्र घोटेकर, भाऊसाहेब घोटेकर, गणेश घोटेकर, आंबादास घोटेकर, ज्ञानेश्वर घोटेकर, अनिल घोटेकर, नितीन जाधव यांच्यासह अनेक नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.