
टीईटी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयामुळे परीक्षा पुढे ढकलली?
वेगवान मराठी: मारुती जगधने
मुंबई, दि. २७ जून : उद्या (२८ जून) राज्यभर होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत काही संशयितांकडून प्रश्नपत्रिकेशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात जप्त प्रश्न आणि अधिकृत प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये साम्य आढळल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता आणि पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. परीक्षेची नवीन तारीख आणि पुढील सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. �



