जनतेचा बुलंद आवाज’ पत्रकार प्रज्ञानंद जाधव यांना ‘महाराष्ट्र साई गुणरत्न पुरस्कार २०२६’
नांदगाव (प्रतिनिधी) : गेल्या १५ ते १६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात निष्ठेने आणि निर्भीडपणे कार्यरत असलेले नांदगाव येथील पत्रकार प्रज्ञानंद दयाराम जाधव यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र साई गुणरत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. यू अॅड मी फाऊंडेशन आणि झिनीत क्राऊन पिक्चर यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला.
पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध सातत्याने आवाज उठविणाऱ्या प्रज्ञानंद जाधव यांनी शेतकरी प्रश्न, भ्रष्टाचार, आरोग्य, शिक्षण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी सातत्याने लेखणी चालवली आहे. त्यांच्या निर्भीड आणि वस्तुनिष्ठ बातमीदारीमुळे अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फुटली असून, गरजू आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे परिसरात त्यांची ओळख ‘जनतेचा बुलंद आवाज’ म्हणून निर्माण झाली आहे.
त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानाची तसेच सामाजिक बांधिलकीची दखल घेत यू अॅड मी फाऊंडेशन आणि झिनीत क्राऊन पिक्चर यांच्या वतीने त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेदरम्यान शिर्डी येथील साई छत्रा हॉटेलमध्ये पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी चित्रपट निर्माते व उद्योजक मनोज कदम यांच्यासह सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या वतीने आकर्षक ट्रॉफी, प्रमाणपत्र, मेडल आणि शाल प्रदान करून प्रज्ञानंद जाधव यांचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडणाऱ्या पत्रकाराचा झालेला हा सन्मान म्हणजे केवळ प्रज्ञानंद जाधव यांचा नव्हे, तर संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



