
पुनर्विवाहातून रूढींना छेद; श्रीरामनगरात नव्या आयुष्याची मंगल सुरुवात!
दीराने स्वीकारला विधवा भावजयचा हात; तीन वर्षांच्या बाळासह मनीषाचा पुनर्विवाह — साधेपणाने पार पडलेल्या विवाहातून समाजाला सकारात्मक संदेश
वेगवान मराठी : मारुती जगधने
श्रीरामनगर, ता. नांदगाव, दि. ३० : समाजातील रूढी-परंपरांना सकारात्मक दिशा देत विधवा पुनर्विवाहाचा प्रेरणादायी आदर्श श्रीरामनगर येथे रविवारी पाहायला मिळाला. पतीच्या अकाली निधनानंतर संकटात सापडलेल्या मनीषा धर्मा तांदळकर, रा. भांपुर, यांचा त्यांचे दीर विकास विलास सोनाळकर, रा. वाकोद, ता. जामनेर, यांच्याशी पुनर्विवाह शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत साध्या व मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
मनीषा यांच्या पतीचे लग्नानंतर अकस्मात निधन झाले होते. त्यांच्या पदरी तीन वर्षांचे लहान बाळ आहे. पतीच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात मोठे संकट निर्माण झाले. मात्र, कुटुंबीयांनी परिस्थितीचा सकारात्मक विचार करून मनीषाला नव्याने संसार उभारण्याची संधी मिळावी, या भावनेतून पुनर्विवाहाचा निर्णय घेतला.
पतीच्या निधनानंतर सुमारे वर्षभराने कुटुंबात पुनर्विवाहाबाबत चर्चा झाली. मनीषा आणि विकास या दोघांचीही संपूर्ण संमती घेतल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी या विवाहाला आनंदाने मान्यता दिली. मनीषाची आई, विकास यांच्या आत्या मंगलाबाई नानासाहेब देशमुख तसेच विकास यांचे वडील, काका, मामा, मावशी आणि इतर नातेवाईकांनी या निर्णयाला मनापासून पाठिंबा दिला.
श्रीरामनगर येथे आयोजित विवाह सोहळ्यात नातेवाईकांसह परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले. मंगलाष्टकांच्या पवित्र उच्चारात विकास आणि मनीषा विवाहबद्ध झाले. उपस्थित नागरिकांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद देत त्यांच्या भावी संसारासाठी शुभेच्छा दिल्या.
गाजावाजा नाही, अनावश्यक खर्च नाही!
या विवाहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत साधेपणाने पार पडलेला सोहळा. कोणताही गाजावाजा, वाजंत्री अथवा लाऊडस्पीकर न लावता मंगलाष्टकांच्या पवित्र वातावरणात विवाहविधी पार पडला. अनावश्यक खर्च आणि दिखाऊपणाला फाटा देत दोन्ही कुटुंबांनी सामाजिक बांधिलकीचा वेगळा आदर्श निर्माण केला.
विधवा पुनर्विवाहाकडे समाजाने सकारात्मक दृष्टीने पाहावे, तसेच पतीच्या निधनानंतर संकटात सापडलेल्या महिलेला नव्याने आयुष्य उभारण्याची संधी मिळावी, असा महत्त्वपूर्ण संदेश या विवाह सोहळ्यातून देण्यात आला.
मनीषाच्या पुनर्विवाहासाठी पुढाकार घेणाऱ्या दोन्ही कुटुंबीयांचे परिसरात कौतुक होत असून, कुटुंबाचा आधार, परस्पर संमती आणि सामाजिक सकारात्मकता यांचा सुंदर संगम या विवाहातून पाहायला मिळाला.
फोटो कॅप्शन :
श्रीरामनगर येथे पुनर्विवाहानंतर नवदाम्पत्य विकास सोनाळकर व मनीषा तांदळकर यांना उपस्थित नातेवाईक व नागरिकांनी शुभेच्छा देत आशीर्वाद दिला.



