महाराष्ट्र,देश

चाळीसगावात बोरसे परिवारात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम, अंधश्रद्धेला फाटा देत समाजासमोर नवा आदर्श

Nandgaon news

चाळीसगावात बोरसे परिवारात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम, अंधश्रद्धेला फाटा देत समाजासमोर नवा आदर्श
वेगवान मराठी दि 22 August2026

चाळीसगाव वि .प्र. प्रतिनिधी :

चाळीसगाव शहरातील टाकळी प्र.चा. येथील सप्तशृंगी नगर परिसरात एका आगळ्या-वेगळ्या आणि पुरोगामी विचारांच्या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते विक्रम पांडुरंग बोरसे आणि ज्ञानेश्वर पांडुरंग बोरसे यांच्या मातोश्री निसर्गवासी रुख्माबाई पांडुरंग बोरसे यांच्या दशपिंड आणि गंधमुक्तीचा कार्यक्रम पारंपारिक कर्मकांडाला फाटा देत सत्यशोधक पद्धतीने अत्यंत साधेपणाने आणि वैचारिक प्रबोधनाने पार पडला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही भट-भिक्षुकी, मंत्र-तंत्र, कावळा शिवणे यासारख्या अंधश्रद्धा असलेल्या विधींना पूर्णपणे फाटा देण्यात आला. त्याऐवजी महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या तत्वानुसार हा उत्तरकार्याचा विधी पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात संत, महापुरुष आणि महामातांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यामध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, संत तुकाराम महाराज, अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सत्यशोधक समाजाचे विधीकर्ते भगवान रोकडे यांनी सत्यशोधक समाजाची प्रार्थना म्हणून संपूर्ण विधीला सुरुवात केली.
या विधी दरम्यान त्यांनी उपस्थितांना सत्य, समता, बंधुता आणि विज्ञानवाद याचे महत्त्व पटवून दिले. मृत्यूनंतर कोणतेही कर्मकांड केल्याने आत्म्याला शांती मिळत नाही, तर जिवंतपणी केलेल्या चांगल्या कार्यातूनच खरी श्रद्धांजली ठरते, असा वैचारिक संदेश दिला. तसेच संपूर्ण बोरसे परिवाराला एकसंघ, एकजुटीने राहण्याची आणि आईच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याची शपथ देण्यात आली.
याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष पी.डी. पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात बहुजन समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “महात्मा फुलेंनी शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आजही आपण पंचांग अंधश्रद्धा कर्मकांड नारायण नागबली यासारख्या थोतांडात अडकलो आहोत. यातून आपला पैसा, वेळ आणि श्रम वाया जातो. महापुरुषांना फक्त डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेण्याची गरज आहे. रुख्माबाईंच्या परिवाराने सत्यशोधक पद्धतीचा अवलंब करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. हीच खरी महात्मा फुले आणि सावित्रीमाईंना आदरांजली आहे. शोषणमुक्त समाज निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.”
यावेळी सत्यशोधक समाजाचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष भगवान बोरसे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की संत आणि महापुरुषांचे कार्य हे आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्या विचारांवर चालणे म्हणजेच खरे समाजकार्य आहे.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही शोकसभा किंवा रडारड न करता, या दुःखाच्या प्रसंगाचेही प्रबोधनात रूपांतर करण्यात आले. उपस्थित सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आणि मान्यवरांना महापुरुषांच्या विचारांचे अनमोल ग्रंथ भेट स्वरूपात देण्यात आले. यामध्ये महात्मा फुले यांचे ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा असूड’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि इतर प्रबोधनात्मक पुस्तकांचा समावेश होता, जेणेकरून वाचकांमध्ये वैचारिक जागृती निर्माण होईल.
तसेच या परिवाराने मातोश्रींच्या स्मृती प्रित्यर्थ आपल्या शेतात पाच वृक्षांचे रोपण केले. आंबा, चिंच, लिंब, वड आणि पिंपळ या देशी आणि दीर्घायुषी झाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला. झाडे लावून खरी श्रद्धांजली वाहता येते, हा विचार यातून मांडण्यात आला. ही कृती उपस्थितांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली.
या सामाजिक बांधिलकीच्या कार्यासाठी बोरसे परिवाराच्या वतीने सत्यशोधक समाज संघास २१०० रुपयांचा सहयोग निधी देखील देण्यात आला.
या कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये पंचायत समितीचे माजी सदस्य जगन्नाथ धोंडू महाजन, सामाजिक कार्यकर्ते धर्मराज पाटील, भिकन बोरसे, सर्जेराव बोरसे, तुकाराम बोरसे, रघुनाथ बोरसे, भगवान देवरे, पांडुरंग देवरे, भगवान महाजन, रावसाहेब पाटील, अनिल पाटील, सहादू बोरसे, प्रवीण बोरसे, रमेश बोरसे, भालेराव माळी, विठ्ठल महाजन, धनराज वैराळे, अजय महाजन, रामदास महाजन, प्रसिद्ध कीर्तनकार शोभाताई रानडे, शरद महाजन, ईश्वर बोरसे, भालचंद्र महाजन, रमेश सोनवणे, गणेश बोरसे, देवेंद्र बोरसे यांच्यासह समस्त बोरसे परिवार, दस्केबर्डी, आप्तेष्ट, नातेवाईक, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी विक्रम बोरसे आणि ज्ञानेश्वर बोरसे भगवान बोरसे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. सत्यशोधक समाजाच्या चळवळीला बळ देणारा हा कार्यक्रम चाळीसगाव शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!