विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी बससेवा सुरू; भगवान जगणोर यांचे कौतुकास्पद पाऊल वेगवान
Nandgaon news

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी बससेवा सुरू; भगवान जगणोर यांचे कौतुकास्पद पाऊल
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव प्रतिनिधी : नांदगाव तालुक्यातील कसाबखेडा, पोही व इंदिरानगर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासासाठी अनेक वर्षांपासून भेडसावणारी बससेवेची अडचण अखेर दूर झाली आहे. नांदगाव तालुक्याचे भूमिपुत्र तथा नाशिक विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगणोर यांनी विशेष पुढाकार घेत, स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्यास परवानगी दिली.
या बससेवेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात ये-जा करणे अधिक सुलभ होणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या या निर्णयाचे पालक, विद्यार्थी व शिक्षकवृंदांकडून स्वागत करण्यात येत आहे.
यावेळी स्थानक प्रमुख सतीश ईप्पर यांनीही भगवान जगणोर यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी केलेल्या या सहकार्याबद्दल कसाबखेडा, पोही व इंदिरानगर येथील पालक, विद्यार्थी तसेच शिक्षकवृंद यांच्या वतीने भगवान जगणोर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
“विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



