जिल्हा परिषद शाळेत ‘Alexa AI मॅडम’चे अनावरण ; शिक्षक कुंदन देवरेंनी स्वखर्चातून साकारली AI शिक्षिका

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत शिक्षण अधिक मनोरंजक व प्रभावी करण्याच्या उद्देशाने जि.प. प्राथमिक शाळा भऊर दत्तनगर येथे ‘Alexa AI मॅडम’ या अभिनव AI शिक्षिकेची प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. तसेच यावेळी बालचित्रपट महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
शाळेतील शिक्षक कुंदन देवरे यांनी स्वखर्चातून ‘Alexa मॅडम’ची निर्मिती केली असून, इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुरूप प्रश्नांची उत्तरे, माहिती व संवादाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा, कुतूहल आणि तंत्रज्ञानाविषयीची उत्सुकता वाढण्यास मदत होणार आहे.
AI शिक्षिकेच्या माध्यमातून पारंपरिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. ग्रामीण भागातील शाळेत राबविण्यात आलेला हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी व आदर्श ठरणारा असल्याचे मत पत्रकार बाबा पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच काशिनाथ पवार, सदस्य दादा मोरे, सीमा गरुड, तसेच संजय पवार, दीपक पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय शिक्षक रत्नमाला देवरे, संजय गुंजाळ, अशोक बच्छाव, संजीव आहेर, राजेंद्र देवरे तसेच लखन गरुड, पालक, स्थानिक नागरिक, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक कुंदन देवरे यांनी केले, तर मुख्याध्यापिका अरुणा सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपस्थित मान्यवरांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही ‘डिजिटल शिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरुवात’ असल्याचे गौरवोद्गार काढले



