नाशिक ग्रामीण

बिथरलेल्या माकडाचा न्यायडोंगरीत धुमाकूळ; तिघांना जखमी केल्यानंतर वन विभागाकडून जेरबंद

nandgao news

बिथरलेल्या माकडाचा न्यायडोंगरीत धुमाकूळ; तिघांना जखमी केल्यानंतर वन विभागाकडून जेरबंद
वेगवान मराठी :दि 23 August2026

न्यायडोंगरी वि.(प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसांपासून न्यायडोंगरी गावात एका बिथरलेल्या माकडाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या माकडाने शंकर बुधा गायकवाड यांच्या मांडीला जबरदस्त चावा घेऊन त्यांना जखमी केले, तर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक संदीप पाटील व प्रयोगशाळा परिचर नंदकुमार निकम यांना नखांनी ओरबाडून किरकोळ जखमी केले. अखेर नांदगाव वन विभागाच्या रेस्क्यू टीमने सलग दोन दिवस अथक प्रयत्न करून माकडाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात यश मिळविले.

हे माकड अत्यंत भयभीत व बिथरलेल्या अवस्थेत दोन दिवसांपूर्वी गावात आले होते. हायस्कूल व महाविद्यालय परिसरात त्याने आपला ठिय्या मांडला होता. शाळेच्या प्रांगणात दिसणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अंगावर उडी मारणे, खांद्यावर बसणे, पायाला घट्ट मिठी मारणे तसेच नखांनी ओरबाडणे व चावा घेणे, अशा प्रकारे त्याने परिसरात दहशत निर्माण केली होती.

घटनेची माहिती मिळताच नांदगाव वन विभागाच्या रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाच्या पथकाने पहिल्या दिवशी दिवसभर माकडाचा पाठलाग करून जाळीच्या सहाय्याने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चपळाईने हुलकावणी देत माकडाने पथकाला चकवा दिला.

दुसऱ्या दिवशी वन विभागाच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत शॉटगनच्या सहाय्याने भूल देणारे इंजेक्शन डार्ट करून माकडाला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले.

वन विभागाच्या रेस्क्यू टीमने सलग दोन दिवस अथक परिश्रम घेऊन ही मोहीम यशस्वी केल्याने न्यायडोंगरी ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ग्रामस्थांनी वन विभागाच्या पथकाचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

फोटो कॅप्शन :
१) माकडाच्या चाव्यामुळे मांडीला झालेली जखम दाखविताना शंकर बुधा गायकवाड.
२) बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आलेले माकड.
३) कारवाई करणारे वन विभागाचे रेस्क्यू पथक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!