
‘फुले दाम्पत्याचा सत्य इतिहास घराघरात पोहोचवणार’
डॉ. अमोल कोल्हे यांची सत्यशोधक समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चाळीसगाव येथे सदिच्छा भेट; मालिकेला लोकसहभागातून आर्थिक बळ देण्याचा निर्धार
वेगवान मराठी : मारुती जगधने दि 31 August2026
चाळीसगाव, प्रतिनिधी : महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘वारसा मराठी’ या युट्यूब चॅनेलवर ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीमाई जोतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक मालिका सुरू आहे. या मालिकेत महात्मा जोतिराव फुले यांची भूमिका प्रभावीपणे साकारणारे महाराष्ट्रभूषण व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची चाळीसगाव येथे सत्यशोधक समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.
भेटीच्या प्रारंभी चाळीसगाव येथील महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. यावेळी सत्यशोधक समाज संघाच्या वतीने डॉ. अमोल कोल्हे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच महात्मा फुले लिखित ‘सत्यशोधक विधी’ आणि ‘गुलामगिरी’ हे क्रांतिकारी ग्रंथ भेट देण्यात आले. ‘गुलामगिरी’ ग्रंथ स्वीकारताना डॉ. कोल्हे यांनी हा केवळ ग्रंथ नसून बहुजन समाजाच्या मुक्तीचा जाहीरनामा असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी सावित्रीमाई-जोतीराव फुले यांच्या जीवनावरील ऐतिहासिक मालिकेच्या प्रचार, प्रसार आणि अर्थसहाय्याबाबत सविस्तर चर्चा झाली. ‘वारसा मराठी’सारख्या स्वतंत्र आणि अभ्यासू व्यासपीठाच्या माध्यमातून फुले दाम्पत्याचा खरा इतिहास, त्यांचा संघर्ष आणि सत्यशोधक विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम होत आहे. हे कार्य केवळ मनोरंजन नसून सामाजिक प्रबोधनाची चळवळ असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या मालिकेला मोठ्या कॉर्पोरेट प्रायोजकांचा आधार नसून लोकवर्गणी आणि लोकसहभागातून ती उभी राहत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक भाग अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच आर्थिक बळ देण्यासाठी जळगाव जिल्हा सत्यशोधक समाज संघाच्या वतीने शक्य तेवढे सर्वतोपरी अर्थसहाय्य करण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी डॉ. कोल्हे यांना दिले.
चाळीसगाव, एरंडोल, पाचोरा, भडगाव, पारोळा तसेच जळगाव शहर परिसरात मालिकेच्या प्रचारासाठी पोस्टर, सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना इतिहासाच्या सत्यासाठी जसा आग्रह धरला, तसाच आग्रह सावित्रीमाई-जोतीराव फुले यांच्या मालिकेसाठीही आहे. या मालिकेत काल्पनिक कथानकाचा आधार न घेता इतिहासात जे घडले, तेच सत्य स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
महात्मा फुले यांचा सत्यशोधक विवाह, सत्यशोधक समाजाची स्थापना आणि ‘शेतकऱ्याचा असूड’मधील विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहेत. हे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी सत्यशोधक समाज संघासारख्या सामाजिक संघटनांची साथ मोलाची असल्याचेही डॉ. कोल्हे यांनी नमूद केले.
या सदिच्छा भेटीप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धर्मराज पुंडलिक पाटील, सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे, सत्यशोधक समाज संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील, कार्याध्यक्ष कैलास भगवान जाधव, चाळीसगाव तालुकाध्यक्ष भगवान बोरसे, एरंडोल येथील सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन, प्रा. पंकज पाटील, पद्मिनी माळी, हेमांगी महाजन यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटीमुळे चाळीसगाव तालुक्यातील सत्यशोधक चळवळीला नवी ऊर्जा मिळाली असून फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या प्रचार-प्रसाराचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
फोटो कॅप्शन : चाळीसगाव येथे महात्मा फुले स्मारकाला अभिवादन केल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांची सत्यशोधक समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सदिच्छा भेट.



