नाशिक ग्रामीण

पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीत गोवंश तस्करीवर कारवाई, १७ जनावरांची सुटका नाशिक ग्रामीण पोलिसांची गोरक्षक स्कॉडची धडक मोहीम

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि .२० ऑक्टो २०२५ : नाशिक ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत जनावरांच्या चोरीच्या घटना वाढल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार गोरक्षक स्कॉड कार्यान्वित करण्यात आला आहे. या स्कॉडने आज पहाटे पिंपळगाव बसवंत परिसरात मोठी कारवाई करत १७ गोवंश जनावरांची सुखरूप सुटका केली.
पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पिंपळगावच्या दिशेने एक मालवाहू ट्रकमधून अवैधरीत्या जनावरे नेली जात असल्याचे समजले. त्यानुसार गोरक्षक स्कॉड व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वणी चौफुली परिसरात सापळा रचला. वाहन थांबवण्याचा प्रयत्न होताच चालकाने भरधाव वेगाने ट्रक मालेगावच्या दिशेने पळवला. पोलिसांनी पाठलाग करत पाचोरे वणी शिवारात वाहन अडवले. तपासात ट्रकमध्ये निर्दयपणे आखुड दोरीने बांधलेली १७ गोवंश जनावरे आढळली. पोलिसांनी वाहनचालकासह एका विधीसंघर्षिताला ताब्यात घेतले असून, दोन संशयित फरार आहेत.

अटक आरोपी :
१) इमरान अहमद इकबाल अहमद (४२, रा. मालेगाव) – वाहन चालक
२) एक विधीसंघर्षितग्रस्त (रा. मालेगाव)

फरार आरोपी :
३) निसरत खान हनिफ खान उर्फ निट्टया (रा. कुरेशी मोहल्ला, मालेगाव) – जनावरे विकत घेणारा
४) गोपी बाळू खरे (रा. कोशिंबे, ता. दिंडोरी), जनावरे पुरवणारा

सदर आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम ५, ५(अ), ९ व ११ तसेच प्राण्यांशी क्रूरतेने वागण्याबाबतचा कायदा कलम ११(१)(ड) व मोटार वाहन कायदा कलम ८३/१४७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एक टाटा ट्रक (एमएच ४१ जी ६८८६), मोबाईल फोन व एकूण १४ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोरक्षक स्कॉड व स्था. गु. शाखेच्या या कारवाईत पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार सचिन धारणकर, धनंजय शिलावटे, प्रितम लोखंडे, माधव साळे, नवनाथ वाघमोडे, निलेश सावकार व राहुल आहेर यांनी सहभाग घेतला. ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक (मालेगाव) तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!