
पातोंड्याच्या वीर सुपुत्राला शासकीय इतमामात अखेरचा निरोप
‘भारत माता की जय’, ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणांनी पातोंडा दणाणला; हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत जवान ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार
वेगवान मराठी ; मारुती जगधने
पातोंडा, ता. चाळीसगाव, दि. २६ सप्टेंबर : देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले पातोंडा येथील सुपुत्र तथा सशस्त्र सीमा बलाच्या (SSB) ५९ व्या बटालियनमधील हवालदार ज्ञानेश्वर दिनकर पाटील (पिंटू भाऊ) यांना आज त्यांच्या मूळ गावी हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अत्यंत भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. ‘भारत माता की जय’, ‘वीर जवान अमर रहे’ अशा घोषणांनी संपूर्ण पातोंडा परिसर दुमदुमून गेला.
२० वर्षांची देशसेवा
पातोंडा येथील सावरकर चौक परिसरातील रहिवासी असलेले हवालदार ज्ञानेश्वर पाटील यांनी सुमारे दोन दशके देशसेवा केली. १ फेब्रुवारी २००६ रोजी त्यांनी सशस्त्र सीमा बलात (SSB) प्रवेश केला. सध्या ते SSBच्या ५९ व्या बटालियनमध्ये हवालदार पदावर लखनौ येथे कर्तव्य बजावत होते. कर्तव्यावर असतानाच त्यांना वीरमरण आले.
त्यांच्या निधनाची वार्ता पातोंडा गावात पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. देशसेवेत कार्यरत असलेल्या आपल्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले.
विशेष विमानाने पार्थिव आणले
वीर जवान ज्ञानेश्वर पाटील यांचे पार्थिव लखनौ येथून दिल्ली आणि त्यानंतर विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणण्यात आले. तेथून SSBच्या अधिकारी व जवानांच्या ताफ्यासह पार्थिव पातोंडा येथे आणण्यात आले.
पार्थिव गावच्या वेशीवर पोहोचताच ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करून आपल्या वीर सुपुत्राचे स्वागत केले. पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी हजारो नागरिकांचा जनसागर लोटला. महिलांसह अबालवृद्धांनी वीर जवानाला अंतिम श्रद्धांजली अर्पण केली.
पातोंड्याची सैनिक परंपरा
पातोंडा हे स्वातंत्र्यसैनिक आणि सैनिकांचे गाव म्हणून चाळीसगाव तालुक्यात ओळखले जाते. गावातील अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यान्पिढ्या देशसेवेची परंपरा आहे. भारतीय सैन्य, नौदल, सीआरपीएफ, आरपीएफ, एसएसबी, महाराष्ट्र पोलीस यांसह विविध सुरक्षा दलांमध्ये गावातील शेकडो युवक सेवा बजावत आहेत.
ज्ञानेश्वर पाटील यांच्या बलिदानामुळे या परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे. त्यांच्या बलिदानाने पातोंडा गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, देशासाठी बलिदान देणाऱ्या गावातील जवानांची संख्या आता दोन झाली आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
वीर जवानाच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. SSBच्या अधिकारी व जवानांनी मानवंदना देत आपल्या सहकाऱ्याला अखेरची सलामी दिली. त्यानंतर हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय इतमामात अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली.
यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. देशसेवेसाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या जवानाला अखेरचा निरोप देताना उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते.
वीर पत्नी व मुलांच्या आक्रोशाने वातावरण हेलावले
अंत्यसंस्कारावेळी वीर पत्नी, मुलगा, मुलगी तसेच कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. कुटुंबाचा आधार असलेल्या ज्ञानेश्वर पाटील यांच्या जाण्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वृद्ध आई आणि भाऊ असा परिवार आहे.
मान्यवरांसह हजारो नागरिकांची उपस्थिती
अंत्यसंस्कारासाठी SSBचे अधिकारी व जवान, चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, पातोंडा गावचे माजी व विद्यमान सरपंच, उपसरपंच, माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, विविध विभागांचे अधिकारी, तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते तसेच हजारो महिला-पुरुष उपस्थित होते.
पातोंडा गावाने आज आपल्या धाडसी, कर्तव्यनिष्ठ आणि देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सुपुत्राला अश्रुपूर्ण निरोप दिला.
देशसेवेची २० वर्षे पूर्ण करून मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हवालदार ज्ञानेश्वर दिनकर पाटील यांच्या शौर्याला आणि बलिदानाला पातोंडा ग्रामस्थांचे कोटी कोटी नमन!



