दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या वन जमीनधारकांना ७/१२ उतारे, रोजगार हमीची कामे सुरू करण्याची मागणी
Nandgaon News

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या
वन जमीनधारकांना ७/१२ उतारे, रोजगार हमीची कामे सुरू करण्याची मागणी
वेगवान मराठी – मारुती जगधने, नांदगाव”
नांदगाव : नांदगाव तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, पशुधनासाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, तसेच वन जमीनधारकांच्या ताब्यातील जमिनींचे मोजमाप करून त्यांना ७/१२ उतारे द्यावेत, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा, नांदगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली.
या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नांदगाव तालुक्यातील वन जमीनधारकांचे प्रलंबित वनदावे तातडीने स्वीकारून पात्र दावेदारांना शासकीय आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांच्या बांधावरील कामे रोजगार हमी योजनेतून तातडीने सुरू करावीत. ग्रामरोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपये देण्याबाबतच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्याची मागणी
आशा सेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी, अंशकालीन स्त्री परिचर, पोषण आहार कर्मचारी तसेच उमेद कर्मचाऱ्यांना कर्मचारी दर्जा देऊन पीएफ, ग्रॅच्युइटी, पेन्शन व ईएसआय यांसारखी सामाजिक सुरक्षा लागू करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून ७/१२ उतारे कोरे करावेत, पशुधनासाठी चारा-पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी आणि वन जमीनधारकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले
निवेदनात मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या आंदोलनालाही भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे.
नांदगाव नगरपालिकेतील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना कथितरीत्या बेकायदेशीरपणे कामावरून कमी करण्यात आले असून, त्यांना तातडीने पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर कॉ. राजू देसले (राज्य सहसचिव, भा.क.प.), कॉ. मनोहर पगारे (जिल्हा सचिव), कॉ. देविदास भोपळे (जिल्हा सहसचिव), कॉ. भास्कर शिंदे योगेश जाधव आणि प्रकाश भावसार यांच्या उपस्थितीत.



