नाशिक ग्रामीण

आधारभूत मका खरेदीला सुरुवात; 

Nandgdon News

आधारभूत मका खरेदीला सुरुवात;
वेगवान मराठी : मारुती जगधने
दि 8 जानेवारी 2026
नांदगाव शहरात शासनाच्या आधारभूत मका खरेदी केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्ष मका खरेदीला सुरुवात झाली आहे. नांदगाव शहरातील जुन्या तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या शासकीय धान्य गोदामाच्या जागेवर ही खरेदी प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, या ठिकाणी आवश्यक सुविधा, नियोजन व प्रशस्त जागेअभावी शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना  अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या या केंद्रावर एका दिवसात केवळ आठ ते दहा ट्रॅक्टरमधील मक्याचीच खरेदी केली जात आहे. मका खरेदी करताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतच गोण्या भरून मका स्वीकारला जातो. प्रत्येक गोणी स्वतंत्रपणे भरावी लागत असल्यामुळे एका ट्रॅक्टरमधील मका खाली करण्यासाठी साधारण दीड तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे दिवसभरात अत्यल्प प्रमाणातच खरेदी होत असून, सुमारे ८०० हून अधिक शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणी केलेली असतानाही त्यांची प्रतीक्षा दिवसेंदिवस वाढत आहे.
दरम्यान, जुन्या शासकीय गोदामासमोरील व पोलीस ठाण्यासमोरील जी मोकळी जागा नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. परिणामी वाहन पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्याने मका खरेदीसाठी येणाऱ्या ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या रांगा दिवसभर या परिसरात लागून राहतात. यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळाची व गर्दीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या अतिक्रमणामुळे पोलीस ठाण्यात जाणाऱ्या नागरिकांना तसेच कोर्ट गल्लीतील रहिवासी व व्यावसायिकांना ये-जा करण्यासाठी  अडचणी येत आहेत. मोकळी जागा अतिक्रमित झाल्यामुळे कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची छोटी-मोठी वाहने रस्त्यावरच उभी राहतात. परिणामी या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत असून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
याबाबत शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या ट्रॅक्टरमधील मका एक-एक गोणी भरून स्वीकारण्यात येत असल्याने वेळ मोठ्या प्रमाणावर खर्ची पडत आहे. त्याऐवजी ट्रॅक्टर ट्रॉलीतील मका थेट वजन करून एकाच वेळेस खाली करून घ्यावा, अशी ठाम मागणी शेतकरी करत आहेत. यामुळे वेळेची बचत होऊन खरेदी प्रक्रिया अधिक वेगाने आणि सुरळीत होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
तसेच मका खरेदी केंद्रासाठी प्रशस्त व मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी, आवश्यक यंत्रणा व मनुष्यबळ वाढवावे, खरेदी प्रक्रिया अधिक गतिमान करावी आणि सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण तातडीने हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शासनाने याकडे लक्ष द्यावे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!