अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतपिकांच्या पाहणीसाठी आमदार सुहास कांदे मैदानात
Nandgaon News
अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतपिकांच्या पाहणीसाठी आमदार सुहास कांदे मैदानात
नांदगाव: अतिवृष्टीमुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये शेतकरी बांधवांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार सुहास कांदे यांनी साकोरा गट व न्यायडोंगरी गटातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. “शिवसेना महायुतीचे सरकार आणि मी आपला आमदार म्हणून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शेतमालाच्या नुकसान भरपाईसाठी मी सदैव प्रयत्नशील राहील,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, “आपल्याला झालेल्या नुकसानीचा पीक विमा आणि नुकसान भरपाई नक्कीच मिळणार आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रशासनाला सहकार्याच्या सूचना
या दौऱ्यादरम्यान, आमदार कांदे यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी, तसेच गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांना नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, संकटाच्या काळात कोणीही शेतकऱ्यांना अडवणूक न करता पंचनामा त्वरित करण्याची ताकीदही त्यांनी दिली. यावेळी शिवसेना पदाधिकारी, तसेच गावातील ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पाहणी दौरा
अतिवृष्टी पाहणी दौऱ्याची सुरुवात सकाळी साकोरा येथून झाली. त्यानंतर तलवाडे, वेहळेगाव, आमोदे, बोरडाडे, जामदरी, कळमदरी, पळशी, सावरगाव, न्यायडोंगरी, जळगाव बुद्रूक तसेच रस्त्यालगत विविध ठिकाणी शेतकरी बांधवांची भेट घेऊन त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. या दौऱ्यात शिवसेनेचे पदाधिकारी सुनील सौदाने, गटविकास अधिकारी खताळे, तालुका कृषी अधिकारी, बाजार समितीचे सभापती, सर्व संचालक, संबंधित गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



