नाशिक ग्रामीण

सिन्नर मध्ये पाणी बाणी,पाणीटंचाईविरोधात ठिय्या आंदोलन…

शरद शेळके/सिन्नर :

सिन्नर शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील अण्णाभाऊ साठे नगर (मांग वाडा) परिसरात गेल्या दीड महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत. वारंवार तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त महिलांनी अखेर थेट सिन्नर नगर परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार निषेध नोंदवला.
अण्णाभाऊ साठे नगर परिसरात अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरगुती वापरासाठी, पिण्यासाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने महिलांना लांब अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर समस्येबाबत प्रभागातील नगरसेविका शोभा राजेंद्र जाधव यांनी सिन्नर नगर परिषद प्रशासनाला तब्बल दीड महिन्यापूर्वी लेखी निवेदन देऊन तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. मात्र, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
वारंवार मागणी करूनही प्रश्न न सुटल्याने महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी हंडे घेऊन थेट नगर परिषद कार्यालय गाठले. महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत हंडा मोर्चा काढला. नगर परिषद कार्यालयात पोहोचताच महिलांनी सोबत आणलेले हंडे आपटून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. या घोषणाबाजीमुळे कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी महिलांनी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश करून त्यांच्या टेबलवर हंडे ठेवले आणि कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले. “आम्हाला नियमित पाणीपुरवठा द्या”, “आमच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करू नका”, “पाणी हा आमचा हक्क आहे” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
महिलांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, तातडीने पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. या आंदोलनामुळे नगर परिषद प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली.


दरम्यान, नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध केला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर होत चालली असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अण्णाभाऊ साठे नगरातील महिलांनी उभारलेला हा हंडा मोर्चा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत असून, प्रशासनाने आता तरी जागे होऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शरद शेळके

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील १० वर्षांपासून कार्यरत...ऑनलाईन बातमीदारीत वेगवान न्यूज पोर्टल पासून सुरूवात परिसरातील सामाजिक, राजकीय, कृषी विषयावर अभ्यासपूर्व लिखाण... पोर्टल,लोकल वृत्तपत्र,गावकरी यांसारख्या प्रिंट मीडिया मध्ये काम,सध्या पुढारी आणि वेगवान नेटवर्क माध्यमातून पत्रकारिता सुरूच...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!