नाशिक ग्रामीणशेती

 ‘देवळा-चांदवडचा ‘दुष्काळी’ शिक्का पुसणार; ‘जलसमृद्धी अभियाना’तून पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार! ; आमदार आपल्या गावी अभियानाचा शुभारंभ

वेगवान नाशिक / बाबा पवार

 

देवळा : देवळा आणि चांदवड तालुक्यातील पिण्याच्या व सिंचनाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी कंबर कसली आहे. ‘आमदार आपल्या गावी’ या त्यांच्या   संकल्पनेतून ‘जलसमृद्धी अभियान’ त्यांनी हाती घेतले असून, या अभियानाचा शुभारंभ देवळा तालुक्यात  आज गुरुवार दि. ८ जानेवारी रोजी तहसील कार्यालय येथून करण्यात आला.

मतदारसंघातील  शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला तरच खऱ्या अर्थाने मतदार संघाचा विकास होईल, या भावनेतून हे अभियान आमदार डॉ. राहुल आहेर राबवित आहेत. तहसील कार्यालय येथे विविध गावातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ केल्यानंतर त्यांनी गणनिहाय गावागावात जाऊन प्रत्यक्षात पाहणीला सुरवात केली आहे. खर्डा गटातील काही गावांना त्यांनी आज भेटी देत ज्या ठिकाणी स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार काम करून पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल तेथे प्रत्यक्ष पाहणी केली.  गावागावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत कोणकोणते काम कशा पद्धतीने करून एक एक गाव पाण्याच्या बाबतीत सदन करता येईल या बाबत आढावा घेतला जात आहे.

या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे आ. डॉ. आहेर यांच्यासोबत तापी खोरे विकास महामंडळ, मृद व जलसंधारण, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. यामुळे समस्यांवर जागीच तांत्रिक चर्चा होऊन उपाययोजनांना गती मिळणार आहे. नारपार योजनेअंतर्गत मंजूर होत असलेल्या कामांचा लाभ शेवटच्या टोकापर्यंत कसा पोहोचवता येईल, यावरही चर्चा होणार आहे. सोबतच पाझर तलाव व ब्रिटिशकालीन नादुरुस्त बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे. पाट चारी काढणे,  आवश्यकतेनुसार नवीन वळण बंधारे व साठवण बंधारे बांधणे,  प्रवाही व  पावसाचे पाणी अडवून टंचाईग्रस्त भागाकडे वळवणे,  उपसा जलसिंचन (लिफ्ट) योजना आणि कालव्यांद्वारे सिंचन क्षेत्र वाढवणे. कालव्यांची दुरुस्ती करणे अशा आवशक्य त्या सर्वच कामांच्या माध्यमातून हे मिशन पूर्ण केले जाणार आहे.

चांदवड तालुक्यात देखील  शुक्रवार दि. ९ जानेवारी दुपारी १२:०० वा. तहसील कार्यालय चांदवड येथून या अभियानाची सुरवात केली जाणार आहे. तसेच गट निहाय दोन्ही तालुक्यातील गावांना भेटी देऊन पाहणी केली जाणार आहे.

​”देवळा आणि चांदवड तालुक्यातील पाणीप्रश्न हा माझ्यासाठी केवळ राजकारणाचा भाग नसून अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला, तरच माझ्या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. ‘दुष्काळी तालुका ही ओळख पुसून दोन्ही तालुके पाणीदार करण्याचा माझा  मानस आहे. याच उद्देशाने माझ्या संकल्पनेतून मी ‘जलसमृद्धी अभियान’ हाती घेतले असून, या पंचवार्षिकमध्ये पाण्याचे योग्य नियोजन करण्यावरच माझा सर्वाधिक भर असेल. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी मी स्वतः अधिकाऱ्यांसह आपल्या गावात येत आहे. ग्रामस्थांनी, सरपंच आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी आमदार डॉ.आहेर यांनी केले.”

२६ जानेवारी विशेष ग्रामसभेत सूचना मागवा
​”पाणीविषयक उपाययोजनांबाबत २६ जानेवारीच्या विशेष ग्रामसभेमध्ये नागरिकांच्या सूचना आणि आवश्यक कामांची यादी मागवण्यात यावी. आपल्या भागातील पाण्याच्या समस्या आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील, याबद्दल या ग्रामसभेत थेट संवाद साधावा; जेणेकरून आपल्याला एक ठोस कृती आराखडा (Action Plan) तयार करून त्यावर प्रत्यक्ष काम करता येईल.” असे देखील आमदार डॉ. आहेर यांनी सांगितले.
 या पाहणी दौऱ्यात भाजप तालुकाध्यक्ष किशोर आहेर, माजी जि.प. सदस्य प्रशांत देवरे, मविप्र माजी संचालक प्रमोद पाटील, माजी जि.प. सभापती अरुण आहेर, सुनील आहेर खाजगी बाजार समितीचे अध्यक्ष सुनील आहेर  यांच्यासह  स्थानिक ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रमुख व्यक्ती तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी हे उपस्थित होते.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!