शेती

हवामान बदलाचा द्राक्ष बागांना मोठा फटका ; ८० टक्के निर्यात घटणार?

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.११ नोव्हें २०२५ :- यावर्षी मे ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत झालेल्या सातत्यपूर्ण अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. हवामानातील या अनियमिततेमुळे वेलींना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही, परिणामी घडनिर्मितीची (गर्भधारणा) प्रक्रिया बाधित झाली. परिणामी अनेक ठिकाणी ५० ते ९० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले आहे. दरवर्षी एका वेलीपासून ६० ते ७० घड मिळत असताना, यंदा ही संख्या फक्त २ ते ५ घडांवर आली आहे.
हवामान बदलाच्या या थेट परिणामाचा द्राक्षे
निर्यातीवरही गंभीर परिणाम होणार आहे. भारताने २०२३- २४ साली ३.४४ लाख टन ताज्या द्राक्षांची निर्यात केली होती. त्यातून भारताला ३४६० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते. त्यात एकट्या महाराष्ट्राचा वाटा ६७ टक्के होता. द्राक्षे निर्यातीसाठी युरोप हा भारताचा प्रमुख बाजार असून, विशेषतः नेदरलँड्स, जर्मनी आणि युनायटेड किंगडम या देशांना सर्वाधिक द्राक्षे निर्यात केली जाते. परंतु या हंगामात हवामान बिघडल्यामुळे निर्यातीचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अल्प उत्पादनासोबतच काही भागात द्राक्षे वेलींची वाढ खुंटल्याने आणि दर्जा कमी झाल्याने निर्यातीयोग्य फळांचा टक्का अजून कमी झाला आहे. परिणामी युरोपमधील मागणी पूर्ण करण्यासाठी लागणारा पुरवठा घटणार आहे. द्राक्षे पंढरी ठप्प झाल्याने व उत्पादन घटल्याने आणि दर्जा टिकवणे कठीण झाल्याने निर्यातीतील भारताची स्पर्धात्मकता धोक्यात आली आहे. यामुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान तर होणारच आहे. त्यासोबतच, द्राक्षे उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

@ नाशिक जिल्ह्यात द्राक्षे पिकायोग्य हवामान राहिले नाही, त्यातच यावर्षी अतिवृष्टीने फटका दिला. अवकाळी पाऊस आणि उष्णतेच्या बदलत्या चक्रामुळे वेलींना योग्य पोषण आणि सूर्यप्रकाश मिळाला नाही. परिणामी घडनिर्मिती थांबली आणि उत्पादन घटले. त्यामुळे शासनाने द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
रमेश शेळके
द्राक्षे उत्पादक शेतकरी

@ हवामान बदलाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, द्राक्ष उत्पादकांना पिक व्यवस्थापन आणि जलनियोजनासाठी तज्ज्ञ मार्गदर्शनाची गरज भासत आहे. भविष्यात हवामान प्रतिरोधक वाण, पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन आणि ग्रीनहाऊस शेती यासारख्या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे. अन्यथा भारताची द्राक्षे निर्यात दीर्घकाळ घटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाल्मिक सांगळे
संचालक, द्राक्षे बागायतदार संघ

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!