महाराष्ट्र,देश

अजब प्रकार : २ लाख २० हजार सह सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची खोटी फिर्याद, प्रत्यक्षात ९०० रुपये आणि नकली दागिने चोरीला 

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : तालुक्यातील मेशी येथील एका शेतकऱ्याने, २ लाख २० हजार रुपयांची रोकड आणि तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची खोटी तक्रार देवळा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी २४ तासांच्या आत तपास करून एका संशयिताला पकडले, पण चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले.

मेशी गावातील शेतकरी नामदेव वेडू सिरसाठ यांनी रविवारी त्यांच्या शेतातील घरात चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत केली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहितीदार आणि तांत्रिक तपास यांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पिंपळगाव बसवंत येथून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले.

परंतु, पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, सत्य समोर आले. आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेल्या वस्तूंची तपासणी केली असता, चोरीला गेलेली रक्कम फक्त ९०० रुपये होती आणि कथित सोन्याचे मंगळसूत्र नकली होते. यानंतर पोलिसांनी तक्रारदार नामदेव सिरसाठ आणि त्यांच्या पत्नीकडे चौकशी केली. त्यांनी गावच्या दोन व्यक्तींच्या सांगण्यावरून चोरीची रक्कम आणि दागिन्यांची किंमत वाढवून सांगितल्याची कबुली दिली.

पोलिसांनी जलद तपास करावा, या उद्देशाने त्यांनी खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. या खोट्या तक्रारीमुळे पोलिसांचा मौल्यवान वेळ आणि मनुष्यबळ वाया गेले. पोलिसांनी या प्रकरणात तक्रारदार नामदेव सिरसाठ यांच्यासह खोटी माहिती देण्यास प्रवृत्त करणाऱ्या मेशी येथील दोन व्यक्तींनाही कडक समज दिली आहे. भविष्यात अशा प्रकारे दिशाभूल केल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी दिला आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!