शेतकऱ्यांना दिलासा,कांद्याचे दर वाढणार? कांद्यावरील दरघटीवर नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद १९ सप्टें २०२५ :- राज्यात यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असून, त्यामुळे बाजारातील दर घसरले आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत.
केंद्रीय सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावानुसार, कांद्यावरील निर्यात अनुदान दुप्पट करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची स्पर्धात्मकता वाढून शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, बाजारात अफवा पसरवून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या साठेबाज आणि नफेखोरांवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली विशेष दक्षता समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समित्या सतत निरीक्षण करून बाजारातील व्यवहार पारदर्शक राहतील याची काळजी घेतील.
फक्त तात्पुरत्या उपाययोजनांवर न थांबता, राज्य सरकारने शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित कांदा निर्जलीकरण व प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पांमुळे कांद्याचे शेल्फ – लाईफ वाढेल, मूल्यवर्धन होईल आणि शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ उपलब्ध होईल.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय दिलासा देणारा ठरण्याबरोबरच भविष्यातील उत्पादन व बाजारपेठेतील अस्थिरतेला तोंड देण्यासाठीही उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



