नाशिक ग्रामीण

सत्ताधारी शिवसेना शिंदे गट उतरला रस्त्यावर; डिझेल बंदीविरोधात आंदोलनाचा इशारा!

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : चालू खरिपाच्या हंगामात प्रशासनाने लागू केलेल्या जाचक नियमांमुळे शेतकरी कमालीचा त्रस्त झाला आहे. शेती मशागतीसाठी ड्रम किंवा कॅनमधून सुटे डिझेल देण्यावर शासनाने बंदी घातल्यामुळे बळीराजाची मोठी कोंडी झाली आहे. याच गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज देवळा येथे  सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या  पदाधिकाऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवानंद वाघ यांनी सांगितले की, “मी पक्षाचा जबाबदार पदाधिकारी असलो, तरी सर्वप्रथम एक शेतकरी आणि कुणबी आहे,”  पेट्रोल पंपावर सुट्या डिझेलसाठी रेशन कार्ड, किंवा शेतकरी असल्याचा दाखला मागण्याच्या प्रशासनाच्या जाचक अटी तातडीने शिथिल कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच असे न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल असा थेट इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.

बैल शेती आता संपुष्टात आली असून आधुनिक शेती पूर्णपणे यंत्रसामग्रीवर अवलंबून असल्याने शेतकऱ्याला शेतात डिझेल नेण्यासाठी ड्रम किंवा कॅनमध्ये मिळणे अत्यंत गरज असते, आणि ते शेतकऱ्यांना मिळायला हवे
असे शिवसेना शिंदे गट चांदवड-देवळा विधानसभा शेतकरी सेलचे अध्यक्ष कृष्णा जाधव यांनी स्पष्ट केले.

आंदोलन सुरू असतानाच योगायोगाने बाजार समितीकडे जाणाऱ्या विनोद आहेर या शेतकऱ्याचे ट्रॅक्टर डिझेल संपल्याने पाच कंदील चौकातच बंद पडले. त्यामुळे काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली. शेवटी आंदोलकांनी स्वतः ट्रॅक्टरला धक्का मारत ते डीझल पंपापर्यंत पोहोचवले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी प्रशासनाला थेट चेतावणी दिली आहे. पुढील दोन दिवसांत ड्रममध्ये डिझेल मिळणे खुले झाले नाही, तर सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन पाच कंदील चौकात थेट ‘रस्ता रोको’ करतील आणि त्यानंतर होणाऱ्या तीव्र आंदोलनाला प्रशासनच सर्वस्वी जबाबदार असेल, असा इशारा या वेळी देण्यात आला. याबाबतचे  सविस्तर मागणीचे निवेदन देवळा महसूल व पोलीस प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी  शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख दीपक निकम, शहर प्रमुख नाजीम तांबोळी, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, युवासेना तालुका प्रमुख प्रतीक आहेर, सचिन शेवाळे, शैलेश गुंजाळ, एस. के. शिंदे, विजय आहेर, देवेंद्र निकम, बाबाजी माळी, माधव शिरसाठ, विजय जगताप, डी. के. मोरे,  कांदा उत्पादक संघटना अध्यक्ष देवेंद्र निकम, आबा आहेर, दीपक पवार, दशरथ पूरकर, रवींद्र पवार यांसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!