रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सामूहिक योगसाधना
वेगवान मराठी मारुती जगधने
- दि 25 जानेवारी 2026
रथसप्तमी व जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे महत्त्व वाढवण्यासाठी विविध संस्था सामूहिक सूर्यनमस्कार व योगसाधनेचे आयोजन करत असतात. योगदर्शन योग केंद्र, विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्था तसेच श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर, जय भवानी रोड येथे सामूहिक योगसाधनेचे आयोजन करण्यात आले होते.
सूर्यनारायण देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस आहे. वैदिक काळापासून ऋषी–मुनी व गुरु–शिष्य परंपरेतून सूर्यनमस्काराची साधना आपल्यापर्यंत पोहोचली आहे. पूर्वी घरातील स्त्री-पुरुष स्नानानंतर सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन नमस्कार करत असत, तसेच स्त्रिया तुळशीला प्रदक्षिणा घालून वंदन करत असत. बदलत्या व आधुनिक जीवनशैलीमुळे आज आपण सूर्याकडे पाहण्यासही वेळ देत नाही, परिणामी ‘डी’ जीवनसत्त्वाचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व परिपूर्ण व्यायाम आहे. तो विविध पद्धतींनी केला जातो. काही ठिकाणी 10 अंकांत, तर काही ठिकाणी 12 अंकांत सूर्यनमस्कार केले जातात. सूर्यनारायणाची उपासना म्हणूनही सूर्यनमस्काराला विशेष महत्त्व आहे. सूर्यनमस्कारामध्ये आसने, प्राणायाम तसेच मंत्रसाधनेची सांगड घातलेली आहे. बीजमंत्र ‘ॐ’ पासून सूर्यनमस्काराची सुरुवात केली जाते. यामध्ये योगासनांचा अभ्यास, प्राणायामाची साधना, सूर्यनारायण देवतेची उपासना व मंत्रांचे सामर्थ्य यांचा समन्वय आहे.
सूर्यनमस्कार शक्यतो सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी करावेत. ते करताना आपले तोंड सूर्याकडे असावे. नियमित सूर्यनमस्कार केल्यास शरीर, मन व आत्मा या तिन्ही स्तरांवर लाभ होतो. रक्ताभिसरण व पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो तसेच वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. फुफ्फुसांची व हृदयाची कार्यक्षमता वाढून श्वसनसंस्था सक्षम होते. एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते, मन शांत होऊन सकारात्मकता वाढते तसेच शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते.
उगवत्या सूर्याकडे त्राटक केल्यास दृष्टी सुधारते व एकाग्रता वाढते. सकाळच्या कोवळ्या उन्हात कमी वस्त्रांमध्ये अर्धा तास बसल्यास हाडे मजबूत होतात, कॅल्शियमचे प्रमाण वाढते व रोगप्रतिकारशक्ती बळकट होते. त्वचेची कांती व तेज वाढण्यासही मदत होते.
विविध रंगांच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून ते पाणी 8 ते 15 दिवस दररोज सहा तास उन्हात ठेवल्यानंतर सेवन केल्यास वेगवेगळ्या व्याधींवर लाभ होतो, असे सांगण्यात आले. लाल रंगाच्या बाटलीतील पाणी प्यायल्यास पाठीच्या कण्याचे विकार, सायटिका व गुडघेदुखी कमी होऊन पचनक्रिया सुधारते. नारंगी रंगाच्या बाटलीतील पाणी जननसंस्था व मासिक पाळीच्या विकारांवर उपयुक्त ठरते. पिवळ्या रंगाच्या बाटलीतील पाणी मधुमेह व स्थूलतेवर लाभदायक ठरते. निळ्या रंगाच्या बाटलीतील पाणी घसा, थायरॉईड व मूळव्याधीच्या विकारांवर उपयोगी ठरते, तर जांभळ्या रंगाच्या बाटलीतील पाणी त्वचारोग व मज्जासंस्थेच्या विकारांवर फायदेशीर ठरते.
असा हा सर्वांगसुंदर व परिपूर्ण व्यायाम प्रकार सूर्यनमस्काराचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास जीवन अधिक आनंदी, निरोगी व सकारात्मक बनू शकते. यामुळे आत्मविश्वास व आत्मबल वाढण्यास निश्चितच मदत होते.
योग गुरु प्रा. बाळासाहेब मोकळ



