वसंतराव नाईक तांडा-वस्ती विकास आराखडा बेकायदेशीर?; येवला पंचायत समितीकडे तक्रार
वसंतराव नाईक तांडा-वस्ती विकास आराखडा बेकायदेशीर?; येवला पंचायत समितीकडे तक्रार

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला दि.१ सप्टें २०२५ :- ममदापूर (ता. येवला) ता.नाशिक परिसरातील वसंतराव नाईक तांडा वस्ती विकास आराखडा सन २०२३-२४ हा बेकायदेशीर पद्धतीने तयार करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते देविदास सयाजी गुडघे (रा. ममदापूर) यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पंचायत समिती, येवला येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
गुडघे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ममदापुर ग्रामपंचायत हद्दीतील तांडा वस्ती (लोकसंख्या २६८), मल्हारवाडी (२००), वैद्य वस्ती (१६६), शांतीनगर (११५), आहिल्यादेवी नगर (२५०), साबळे वस्ती (२१०) व बत्तासे वस्ती (५५) या भटक्या विमुक्त जमातींच्या वस्त्या तांडा-वस्ती सुधार योजनेत समाविष्ट आहेत. मात्र या योजनेसाठी तयार करण्यात आलेला आराखडा ग्रामसभेत न मांडता काही निवडक सदस्य व ग्रामसेवकांनी मनमानी करून तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, बेकायदेशीर आराखड्यावर आधारित कामांना सुरुवात करण्यात आली असून, हा निधी हडप करण्याचा प्रयत्न असल्याची शंका व्यक्त केली आहे. संबंधित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांकडून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, सुरु असलेली कामे तात्काळ थांबवावीत, तसेच सखोल चौकशी होईपर्यंत नव्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये, अशी मागणी गुडघे यांनी केली आहे.
निवेदनावर सयाजी रघुनाथ गुडघे, गौरव दत्तात्रय वैद्य, गणेश नानासाहेब गायकवाड, अनिल सुभाष गुडघे, ज्ञानेश्वर विठ्ठल काळे, गणेश कैलाश गुडघे आदींच्या सह्या आहेत. या तक्रारीवरून पंचायत समिती प्रशासन पुढील काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



