Uncategorizedनाशिक ग्रामीण

शहरातील लेंडी नदीवरील पुलाचे काम रखडले;

शहरातील लेंडी नदीवरील पुलाचे काम रखडले; नागरिकांची गैरसोय, प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी
वेगवान मराठी : मारुती जगधने

दि ३१ डिसेंबर २०२५

नांदगाव शहरातील लेंडी नदीवरील महत्त्वाचा पूल गेल्या दहा महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत पडून असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला हा पूल व्यापारी पेठेला जोडणारा मुख्य मार्ग असल्यामुळे या ठिकाणी दिवसभर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. मात्र पुलाचे काम रखडल्याने ये-जा करताना व्यापारी, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सदर पुलावर तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी पूल उभारण्यात आला असला, तरी त्यावर चढ-उतारासाठी आवश्यक पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच सुरक्षिततेसाठी बाजूला बॅरिकेट किंवा संरक्षण कठडे नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी या ठिकाणी अंधार व घसरडी अवस्था निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
व्यापारी पेठेतील दुकानदारांचे म्हणणे आहे की, पुलाच्या अपूर्ण कामामुळे ग्राहकांची ये-जा कमी झाली असून व्यवसायावरही त्याचा परिणाम होत आहे. शाळकरी मुले व महाविद्यालयीन विद्यार्थी रोज या पुलाचा वापर करतात, मात्र सध्याची स्थिती पाहता पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. “हा पूल नेमका कधी पूर्ण होणार? आणि तो नागरिकांच्या वापरासाठी सुरक्षितपणे कधी खुला होणार?” असा प्रश्न नागरिकांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे.
नांदगाव शहराच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला लेंडी नदीवरील पूल तातडीने दुरुस्त करून पूर्ण क्षमतेने सुरू करावा, योग्य पायऱ्या, बॅरिकेट्स व प्रकाशव्यवस्था उभारावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नांदगावकर व्यक्त करत आहेत.

नवनिर्वाचित नांदगाव शहराचे नगराध्यक्ष सागर हिरे यांच्याकडून काम पूर्ण करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करतात .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!