माझ्यासाठी ” रम्मी ” खेळा … काहीतरी जिंका आणि मला पाठवा “
या शेतकऱ्यांकडून कृषिमंत्री कोकाटेंना मनिआर्डर...

वेगवान मराठी / अरुण थोरे
‘निफाड : दि . 25 जुलै 2025 — माझ्यासाठी रमी खेळा’ काहीतरी जिंका आणि मला पाठवा. !’’
देवगाव च्या शेतकर्यांनी कृषी मंत्र्यांना मनिऑर्डर
निफाड पूर्व भागात शेतात पाणी साचल्याने आणलेले बियाणे पेरता आले नाही, म्हणून देवगाव येथील शेतकऱ्याने पडून असलेले बियाणे विक्री करून मिळालेले पैसे थेट राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मनीऑर्डरने पाठवून ‘‘हे पैसे वापरून माझ्यासाठी एक रमीचा डाव खेळा आणि काहीतरी रक्कम जिंकून पाठवा,’’ अशी विनंती केली आहे.
योगेश राजेंद्र खुळे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील देवगाव येथील रहिवासी आहेत. यंदाच्या हंगामात गट क्रमांक ३३७/३ मधील शेतजमिनीत पेरणीसाठी त्यांनी प्रत्येकी १८५० रु. किंमतीच्या तीन पिशव्या असे एकूण ५५५० रु.चे.बियाणे विकत घेतले. मात्र सततच्या पावसाने जमिनीत पाणी साचून जमीन नापीक झाली. बियाणे पेरता आले नाही.
या पार्श्वभूमीवर योगेश खुळे यांनी कृषिमंत्री यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ पाहिला. त्यातून ‘माझे बियाणे तसेच पडून आहे, त्यामुळे उत्पन्न नाही त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. आत्महत्या करण्यापेक्षा बियाणे विकून पैसे कृषी मंत्र्यांना पाठवले तर ते माझ्यासाठी रमीचा डाव खेळतील व जिंकलेले पैसे मला पाठवतील अशी कल्पना त्यांच्या मनात आली. आणि संकल्पना कृतीत आणून कृषीमंत्र्यांना मनीऑर्डर करून पैसे पाठवले.
शेतीचा डाव हरल्याने वैफल्यात गेलेल्या या शेतकऱ्याच्या शब्दांमध्ये उपहास असला तरी, पण त्यामागे सखोल वेदनाही आहे. या प्रकारामुळे कृषीविषयक धोरणे, बियाण्यांचे नुकसान, हवामानातील अनियमितता आणि शेतकऱ्यांच्या बेभरवशाच्या जीवनशैलीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. खुळे यांची ही व्यथा एकट्याची नाही. नाशिक जिल्ह्यातील शेकडो शेतकरी यंदा नापिकीच्या कडेलोटावर आहेत. हवामान बदल, अनियमित पावसाळा, अपुरी सरकारी मदत आणि नशिबाचा खेळ यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. त्यामुळे खुळे यांची रमीच्या उदाहरणातील व्यथा ही केवळ उपहास नाही, तर शासन व्यवस्थेकडे शेतकरी व शेतीचा टाकलेला आरसा आहे.
पावसाच्या फसव्या हंगामात शेती उद्ध्वस्त झाली, नशिबाने साथ दिली नाही, शेतीतून काहीच मिळालं नाही, माझ्या हातात काही उरलेलंही नाही. मला रमीचं काही ज्ञान नाही, शेतीही पडीक पडली आहे. बियाणं विकून मिळालेले ५५५० रु. मी कृषिमंत्र्यांना मनीऑर्डरने पाठवले आहेत. त्यांनी माझ्यासाठी रमी खेळावी आणि जिंकल्यास पैसे पाठवावेत.
योगेश खुळे
आपद्ग्रस्त शेतकरी



