“रक्षक एआय” नाशिक ग्रामीण पोलिसांचा नाविन्यपूर्ण उपक्रम, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तंत्रज्ञानाधारित सुरक्षेचे स्मार्ट हत्यार

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.१ सप्टें २०२५ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने कार्यालयीन सुधारणा अधिक प्रभावी करण्यासाठी १५० दिवसांचा कृती आराखडा राबविला आहे. या आराखड्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा भाग म्हणून नाशिक ग्रामीण पोलिस दलाने ‘रक्षक एआय’ हा व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुरू केला आहे.
आजपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेला ‘रक्षक एआय’ चॅटबॉट ग्रामीण भागातील नागरिकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षा आणि मदतीची नवी सुविधा उपलब्ध करून देणार आहे. पुढील टप्प्यात या सेवेत आणखी सुधारणा करून त्याचा विस्तार करण्याची योजना आहे.
या उपक्रमामागे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे मार्गदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांची संकल्पना महत्त्वाची ठरली आहे. या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सौरभ शिंदे, निरज बावा, ओम निकम, श्रीनाथ कदम आणि यष वडनेरे यांनी अथक परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राध्यापक धनंजय कानडे यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले.
◆ ‘रक्षक एआय’ चॅटबॉटच्या मुख्य सुविधा
स्थान आधारित वैयक्तिक सेवा, सुलभ मेनू, गोपनीय तक्रार नोंदणी, जनजागृती मोहिमा, बहुभाषिक सहाय्य, स्मार्ट सहाय्यक सुविधा, द्विभाषिक उपलब्धता, अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार सुविधा, तात्काळ प्रतिक्रिया
■ पोलिस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व्हावा, तक्रारींना जलद प्रतिसाद मिळावा आणि मदतीसाठी विश्वासार्ह व्यासपीठ निर्माण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला आहे.
बाळासाहेब पाटील
पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण



