नाशिक ग्रामीण

कवी काशिनाथ गवळी यांना ‘गुणवंत साहित्यिक पुरस्कार २०२६’ प्रदान

Nandgaon News

कवी काशिनाथ गवळी यांना ‘गुणवंत साहित्यिक पुरस्कार २०२६’ प्रदान
वेगवान मराठी दि १६ एप्रील 202६
नांदगाव – येथील कवी व गझलकार काशिनाथ गवळी यांना साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल शिवसेनेच्या वतीने स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘गुणवंत साहित्यिक पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, मविप्र संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, व्ही. एन. नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, महाराष्ट्र समाज सेवा संघाचे अध्यक्ष सुधाकर साळी, शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे, साहेबराव कुटे आणि बाळासाहेब ढोबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात पार पडलेल्या या समारंभास भगूर नगरपालिका नगरसेवक व एन.डी.एस.टी. सोसायटीचे उपाध्यक्ष संग्राम करंजकर तसेच सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते.
कवी काशिनाथ गवळी हे पिंपरखेड (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथील कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कला, क्रीडा, संगीत आणि साहित्य ही त्यांची आवडीची क्षेत्रे आहेत. आतापर्यंत त्यांचे ‘बाप बळीचिया बळे’ आणि ‘जाणीवगर्भ’ हे दोन काव्यसंग्रह तसेच पाच प्रतिनिधिक काव्यसंग्रह व गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत.
शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले असून विविध मासिके व वर्तमानपत्रांमधून त्यांच्या साहित्याला प्रसिद्धी मिळाली आहे. ग्रामीण भागात साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक शाळा व महाविद्यालयांना भेटी देत साहित्य चळवळ रुजविण्याचे कार्य सातत्याने केले आहे. तसेच ग्रामीण ते शहरी भागात अनेक कवी संमेलने व गझल मुशायरे यशस्वीरित्या आयोजित केले आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने, कवी संमेलने व गझल मुशायर्‍यांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला असून त्यांच्या रचनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. ते अनेक साहित्यिक संस्थांचे संचालक असून त्यांच्या कार्याला विविध मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस वसंतराव मवाळ, संचालक मंडळ तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद (म.सा.प) शाखा नांदगावचे अध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!