महाराष्ट्र,देश

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी संग्राम भंडारे यांच्या वर गुन्हा दाखल करून अटक करावी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन

वेगवान नाशिक /तुषार रौंदळ

विरगांव दि.१९ऑगस्ट २०२५ :- राज्याचे माजी मंत्री, सुशिक्षित व सर्वसमावेशक विचारांचे प्रगल्भ नेते बाळासाहेब थोरात यांना किर्तनकार म्हणवणार्‍या संग्राम भंडारे नावाच्या व्यक्तीने “आम्हाला नवा नथुराम गोडसे व्हावे लागेल…” असा उघडपणे इशारा देत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे संतापाची लाट उसळली असून सटाणा शहर व बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे भंडारेविरोधात आज मंगळवार (ता.१९) रोजी निषेध आंदोलन छेडण्यात आले. भंडारेवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशाराही देण्यात आला आहे.

माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज तहसील कार्यालयाच्या आवारात किर्तनकार संग्राम भंडारेच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरू केली. यानंतर तहसिलदार कैलास चावडे व पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही देण्याता आले.

यावेळी बोलताना संजय चव्हाण म्हणाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे पुरस्कर्ते आणि संयमी आणि अभ्यासू नेते आहेत. विरोधी पक्षाचे नेते सुद्धा त्यांच्यावर टिका करताना जपून शब्द वापरतात. मात्र संत, महात्म्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात स्वतःला किर्तनकार म्हणवून घेणार्‍या संग्राम भंडारे याने थोरात यांना जीवे मारण्याची धमकी देताना ‘आम्हाला आता नथूराम गोडसे व्हावे लागेल’ अशी जाहिर इशारा दिला आहे. ही धमकीच नसून राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव करणारी समाजविघातक कृती सुद्धा आहे. नथूरामचा गौरव करणार्‍यांना महाराष्ट्राच्या भुमीत कोणतेही स्थान नाही.

तालुकाध्यक्ष केशव मांडवडे म्हणाले, वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे भुषण आहे. या संप्रदायाने जगाच्या कल्याणाची शिकवण मानवजातीला दिलेली आहे. मात्र आज या संपद्रायामध्ये संग्राम भंडारे सारखी काही समाजविघातक वृत्ती घुसखोरी करून त्याचा राजकीय कारणांसाठी वापर करीत आहेत. वारकरी संप्रदायाने सजग राहताना अशा प्रकारे धमकी देणाया समाजकंटकांवर सरकारने कठोर कायदेशिर कारवाई करावी. भाजप महायुती शासनाच्या कार्यकाळात राज्यात सर्वत्र गुंडगिरी, जीवे मारण्याच्या धमक्या, हल्ले यांसारख्या प्रकारात मोठी वाढ झालेली आहे. अध्यात्माच्या नावाखाली हिंसा, दहशतवाद आणि खुनाच्या धमक्या देणाऱ्या अशा समाजकंटकांना सरकारने पाठीशी घालू नये. संग्राम भंडारेवर तातडीने कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही श्री.मांडवडे यांनी दिला.

आंदोलनात तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शहराध्यक्ष भारत काटके, कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, रायुकाँचे तालुकाध्यक्ष चेतन वणीस, शहराध्यक्ष सुमित वाघ, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, ज.ल.पाटील, संजय पवार, बाळासाहेब भांगडीया, आनंदा सोनवणे, प्रज्वल भामरे, बापू बागुल, मिलिंद शेवाळे, रोशन जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

दरम्यान, बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे गांभीर्य लक्षात घेता बागलाण तालुक्यातील काँग्रेस पक्षाकडून मात्र कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, तसेच एकही आंदोलन उभारले गेले नाही. त्याउलट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी तात्काळ मैदानात उतरून आंदोलन छेडले. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात काँग्रेसच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, राष्ट्रवादीने पुढाकार घेतल्यामुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!