वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.२ ऑगस्ट २०२५ : निफाड तालुक्यातील तब्बल ५४ शेतकऱ्यांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ओझर पोलिसांनी द्राक्ष व्यापाऱ्याला अटक केली आहे. दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देत असलेला हा व्यापारी अखेर उगाव (ता. निफाड) येथून गजाआड करण्यात आला आहे. या प्रकरणातील अन्य दोन संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलम आमीन बागवान (रा. बागवान गल्ली, वरचे चांदवड), वसीम उर्फ फिरोज युसुफ शेख (रा. उगाव), कलीम बागवान (रा. गांधीनगर, कोपरगाव) आणि बबलु गफार शेख (रा. उगाव, ता. निफाड) या व्यापाऱ्यांनी संगनमताने मार्च २०२३ मध्ये निफाड तालुक्यातील सुकेना, वनसगाव, ब्राह्मणगाव शिवडी, सावरगाव, नांदुर्डी, पालखेड आदी गावांतील शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदीसाठी व्यवहार केले.
व्यवहारावेळी शेतकऱ्यांना काही रक्कम रोख देत उर्वरित रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आली. मात्र द्राक्षांचा खुडा झाल्यानंतर धनादेश बँकेत सादर करताच खात्यात शिल्लक रक्कम नसल्याने चेक न वठता परत आले. त्यानंतर व्यापाऱ्यांकडे पैसे मागितले असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित ५४ शेतकऱ्यांनी २३ जून २०२३ रोजी ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर सर्व संशयित फरार झाले होते. या प्रकरणात कलीम बागवान याचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला, तर इतर तिघे फरार होते.
दरम्यान, बबलु गफार शेख उगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक निलिमा डोळस, जितेंद्र बागुल, राजेंद्र डंबाळे, भास्कर जाधव यांच्या पथकाने कारवाई करत त्याला अटक केली. मुख्य संशयित आलम बागवानचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला असून त्याचा तसेच वसीम उर्फ फिरोज शेख याचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी एपीआय निलिमा डोळस यांनी दिली.