महिला आरक्षणाने गमावला अंदरसूल गटाचा परीस स्पर्श
महिला आरक्षणाने गमावला अंदरसूल गटाचा परीस स्पर्श

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला /दिनांक: 14 :ऑक्टोबर : साधारणपणे जिल्हा परिषद गटाचा सदस्य म्हणजे जिल्हा परिषदेशी निगडीत प्रश्नांची उकल करून त्या संबंधी सोयी सुविधा उपलब्ध करून देणारा लोकप्रतिनिधी, अशी काहीशी तत्सम जबाबदारी पार पाडणारा नेता किंवा नेतृत्व.
गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या पारंपरिक मर्यादेच्या सीमा भेदून त्याही पलीकडे अमर्याद क्षेत्रांना कवेत घेऊ पाहणारा लोकप्रतिनिधी लाभणार असेल तर त्या प्रभागाचे किंवा गटाचे भाग्य उजळले असेच म्हणावे लागेल.
असेच काही अंदरसूल जिल्हा परिषद गटाच्या बाबतीत घडता घडता बिघडले. अंदरसूल करांच्या भाळी पुन्हा एकदा लाल दिव्याचे दर्शन देऊ शकणारा उमेदवार महिला आरक्षणाने नाकारला , नव्हे तर अंदरसूल करांचा सुवर्ण स्पर्श हुकला.
त्याला निमित्त ठरले आजचे जिल्हा परिषद आरक्षण!
येवला विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते ना छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशावरून गेल्या पाच वर्षांपासून येवला संपर्क कार्यालयात जनतेच्या सेवेसाठी सुरू असलेल्या लोकोपयोगी योजना आणि विकास कामांचा आढावा घेण्यासाठी तसेच नागरिकांना भेडसावत असलेल्या दैनदिन समस्या सोडविण्यासाठी साप्ताहिक आढावा बैठकीच्या माध्यमातून त्यांच्यातील धडाकेबाज निर्णयक्षमता, समस्येचा ठाव घेण्याची अभ्यासू आणि धाडसी वृत्ती तसेच सर्वंकष सकारात्मकता यामुळे त्यांच्या नेतृत्वाची आस चाणाक्ष अंदरसूल करांच्या मागणीतून व्यक्त होऊ लागली. नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्याने त्या संदर्भाने त्यांच्या उमेदवारी ची मागणी होऊ लागली . मात्र गेली ३५ वर्ष भुजबळ साहेबांना दैवत मानून Boss is always Right या ओळीवर विश्वास ठेवून साहेबांनी दिलेल्या प्रत्येक आदेशाला शिरसावंद्य मानणाऱ्या दिलीप अण्णा यांनी जनतेच्या मागणीला उत्तर देताना साहेब सांगतील ती पूर्वदिशा असाच निर्धार बोलून दाखविला. गेली ३५ वर्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेकांना विविध पदांवर आरुढ करण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या अण्णांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने संविधानिक पदावर बसून आपल्यातल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवून देण्याची संधी हुकली असली तरी त्यापेक्षा अंदरसूलकरांच्या होऊ घातलेल्या परीसस्पर्शाला महिला आरक्षणाने हूल दिली हे जास्त खेदजनक आहे असे म्हणावे लागेल.
प्रश्न कुठलाही असेल तो सोडविण्यासाठी विशेष अधिकार असलेच पाहिजे असे नाही तर तेथे असावी लागते सकारात्मकता. समस्या घेऊन आलेल्या माणसांना समजावून घेत त्या समस्येला संपविण्यासाठी प्रसंगी पदरमोड करण्याची तयारी ठेवणाऱ्या दिलीप अण्णांच्या स्वभावामुळे प्रभावित होऊन दिवसेंदिवस मंगळवारी होत असलेल्या साप्ताहिक बैठकीत येणाऱ्या नागरिकांचा लोंढा वाढतो आहे.
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी येवल्यात उपस्थित असलेल्या दिलीप अण्णांनी आरक्षण सोडतीनंतर प्रतिक्रिया देताना भुजबळ साहेबांच्या कार्यकर्ता हीच मोठी पदवी समजून यापुढेही भुजबळ साहेबांच्या आदेशानुसार प्रामाणिकपणे काम करीत राहू असा विश्वास व्यक्त केला.
जिल्हा परिषदच काय पण देशभरातून कुठेही काहीही मदत मिळवून देऊ शकणारा लोकप्रतिनिधी या निमित्ताने या गटाने गमावला हेच आजचे दिनविशेष .



