महाराष्ट्र,देश

आनंदाचा शिधा योजना बंद, गोरगरीबांच्या आयुष्यात सरकारने पसरवला काळोख, दिपिका चव्हाण यांनी सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले निवेदन

*आनंदाचा शिधा बंद करून सरकारने दिवाळीत अंधार घातला*
*दीपिका चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल : मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले निवेदन*
—————-

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ

सटाणा दि.९ आक्टोबर २०२५ : ऐन दिपावलीसारख्या आनंदोत्सवाच्या काळात सरकारने “आनंदाचा शिधा” योजना बंद करण्याचा घेतलेला निर्णय हा गोरगरीबांच्या आयुष्यात काळोख पसरवणारा आहे. एकीकडे बाजारपेठांमध्ये दिवाळीची धामधूम सुरू असताना, दुसरीकडे गोरगरीब जनतेच्या घरांवर मात्र अंधार दाटला आहे. महायुती सरकारने गेल्या वर्षी निवडणुकांच्या तोंडावर सुरू केलेली ही योजना आता बंद करण्याचा निर्णय घेतल्याने “गरज सरो, वैद्य मरो” असा हा प्रकार असल्याची तीव्र प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत असून, शासनाने “आनंदाचा शिधा” योजना पुनश्च सुरू करावी, अशी मागणी बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात माजी आमदार सौ.चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात शासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, प्रचंड महागाई आणि बेरोजगारीमुळे आधीच पिचून गेलेल्या सर्वसामान्यांच्या तोंडचा घास काढण्याचे पाप सरकार करत आहे. ‘आनंदाचा शिधा’ ही योजना म्हणजे गोरगरिबांसाठी दीपावलीचा खरा आनंद होती. पण आता त्यांच्या दिवाळीत प्रकाशाऐवजी नैराश्य भरले जाणार आहे.”
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने, सत्ता मिळाल्यानंतर जनतेला अनेक आश्वासने दिली; परंतु आता त्याच जनतेच्या पोटावर लाथ मारण्याचे काम सुरू केले आहे. “आनंदाचा शिधा” योजनेद्वारे राज्यातील तब्बल १ कोटी ६३ लाख लाभार्थ्यांना रवा, साखर, चनाडाळ, तेल आणि तूप मिळत होते. ही योजना गरीबांसाठी ‘आनंदाचा दीप’ ठरत होती. मात्र, आता या योजनेचा दिवा सरकारनेच विझवला आहे. आर्थिक तुटीमुळे आणि इतर योजनांवरचा खर्च वाढल्यामुळे ही योजना थांबवल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र ‘लाडकी बहीण’ सारख्या इतर योजनांसाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून देणारे सरकार गरीबांच्या शिध्यासाठी पैसा नाही असं म्हणणं म्हणजे दुटप्पीपणा आहे.
शिवभोजन योजनेचाही बोजवारा ग्रामीण भागात उडाल्याने गरीबांसाठीच्या योजनांबाबत सरकारच्या उदासीनतेचे चित्र स्पष्ट दिसत आहे. अनेक केंद्रांचे अनुदान थकले असून काही केंद्रे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या दोन योजना बंद झाल्याने गरीब व मजुरवर्गावर दुहेरी फटका बसला आहे. गावोगावी सुरू असलेली स्वस्त थाळी बंद झाल्याने कामगार वर्गाला दोन वेळच्या जेवणासाठी मोठे कष्ट करावे लागत आहेत. शहरातील चमक-धमक आणि फटाक्यांच्या आवाजात गावोगावी अंधारलेली घरे, भुकेली पोटी झोपणारी माणसे आणि मुलांच्या हातात न लागलेला गोड शंकरपाळा – हीच खरी शासनाच्या धोरणांची परिणामकारकता आहे.
सरकारकडून लोकप्रिय योजनांचा फक्त दिखावा केला जात असून, प्रत्यक्षात गोरगरिबांसाठीच्या योजनांची गळचेपी सुरू आहे. निवडणुकीत दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्ष कृती यात तफावत स्पष्ट दिसत आहे. शासनाने तात्काळ ‘आनंदाचा शिधा योजना’ पुन्हा सुरू करावी, जेणेकरून गोरगरीब जनतेची दिवाळी ‘आनंदात’ जाईल, नाहीतर सरकारविरोधात राज्यभर जनआक्रोश उसळेल. आनंदाचा शिधा थांबवणाऱ्यांना जनता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकित मतदानपेटीतून धडा शिकवेल, असा इशाराही सौ.चव्हाण यांनी दिला आहे.

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!