15 ऑगस्टला येवला येथे शेतकरी कर्जमुक्तीची जाहीर घोषणा
15 ऑगस्टला येवला येथे शेतकरी कर्जमुक्तीची जाहीर घोषणा

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला, ता. 13 ऑगस्ट —
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्व प्रकारचे थकीत कर्ज 100% माफ करावे, या मागणीसाठी येवला येथे 15 ऑगस्ट रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकरी “कर्ज न फेडण्याची” आणि “आत्महत्या न करण्याची” सार्वजनिक शपथ घेणार आहेत.
“उद्योजक बुडवतात, शेतकऱ्यांना लिलाव”
“देशातील उद्योजकांनी तब्बल 16 लाख कोटी रुपये बुडवले, तरी त्यांच्या वर कारवाई झाली नाही. जिल्हा बँकेची कलम 88 नुसार चौकशी होऊन संचालक मंडळ तसेच संस्थात्मक कर्ज वसुली झाली नाही. उलट, नेत्यांच्या साखर कारखान्यांना आणि उद्योगांना नियमबाह्य कर्जवाटप करून व्याजासह मुद्दालात 50% सूट दिली गेली. पण शेतकऱ्यांवर मात्र लिलावाची कारवाई केली जाते,” अशी टीका कर्जमुक्त शेतकरी अभियानाचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी केली.
“आता आम्ही काही देणे लागत नाही”
“आता आम्ही जिल्हा बँकेचे काहीच देणे लागत नाही. इतरांची 100% वसुली झालेली दाखवा, मग पुढचा विचार करू. आता जिल्हा बँक बुडाली तरच शेतकरी जगेल. रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचा बँकिंग परवाना रद्द करावा. पुढचे आंदोलन दिल्लीत अमित शहा यांच्या दरबारात होईल,” असे सोनवणे यांनी स्पष्ट केले.
900 दिवसांपासून आंदोलन सुरू
जिल्हा बँकेविरुद्ध नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 900 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. 20 लाख शेतकरी असलेल्या जिल्ह्यातील केवळ काहीच कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत असल्याची खंत आयोजकांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील 54 हजार शेतकऱ्यांवर कारवाई झाली असून, अनेकांच्या जमिनी जप्त झाल्या आहेत.
8040 शेतकरी कर्ज फेडण्यास असमर्थ
येवला तालुक्यातील तब्बल 8040 शेतकरी कोणत्याही समोपचार योजनेतही कर्ज फेडण्यास असमर्थ आहेत. “3 लाख कर्ज असताना फेडू शकलो नाही, आता 12 ते 20 लाख कुठून भरायचे?” असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शपथ विधी
या कार्यक्रमात शेतकरी “कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करणार नाही” अशी सार्वजनिक शपथ भारताच्या राष्ट्रध्वजाला साक्षी ठेवून घेतील.
प्रमुख मार्गदर्शक:
मा. श्री. विठ्ठल राजे पवार, अध्यक्ष व राष्ट्रीय निमंत्रक, शरदजोशी विचारमंच – शेतकरी संघटना महासंघ, एम. एस. फाऊंडेशन.
आयोजक:
भागवतराव सोनवणे, अध्यक्ष – प्रज्ञा फाऊंडेशन, येवला.
📞 88062727333



