नांदगाव-येवला रोडवरील बेकायदेशीर गतिरोधकांमुळे अपघाताचा धोका
Nandgaon News

नांदगाव-येवला रोडवरील बेकायदेशीर गतिरोधकांमुळे अपघाताचा धोका
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव ते येवला मार्गावरील मल्हारवाडी ग्रामपंचायत हद्दीत सुमारे पाच ते सहा गतिरोधक बसविण्यात आले असून, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे पांढरे किंवा झेब्रा पट्टे रंगविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे गतिरोधक वाहनचालकांना अगदी जवळ आल्यावरच दिसून येतात.
वाहनधारकांना अचानक गतिरोधक दिसल्याने वेग कमी करण्यासाठी धावपळ करावी लागते. अशा परिस्थितीत वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता निर्माण होत असून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात हे गतिरोधक अधिक धोकादायक ठरत आहेत.
स्थानिक नागरिक व वाहनधारकांच्या म्हणण्यानुसार, नांदगावपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील या मार्गावर पाच ते सहा गतिरोधक असून त्यांवर कोणतीही चेतावणी फलक किंवा पांढरे पट्टे नसल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित गतिरोधक नियमांनुसार बसविण्यात आले आहेत की नाहीत, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
वाहनधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने या गतिरोधकांची पाहणी करून त्यांच्यावर पांढरे झेब्रा पट्टे रंगवावेत, आवश्यक सूचना फलक लावावेत आणि नियमबाह्य गतिरोधकांबाबत योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होईल आणि वाहनचालकांची सुरक्षितता वाढेल.



