येथील पूर्ण पीठ असलेल्या एकवीरा देवीची चैत्र पौर्णिमेला यात्रा भव्य दिव्य स्वरूपात होणार
Nandgaon news
येथील पूर्ण पीठ असलेल्या एकवीरा देवीची चैत्र पौर्णिमेला यात्रा भव्य दिव्य स्वरूपात होणार .
वेगवान मराठी :मारुती जगधने
दिनांक 18 मार्च 2026
येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त भरविण्यात येणारी माता एकवीरा देवीची पारंपरिक यात्रा यंदा विशेष ठरणार आहे
दरवर्षी तीन दिवस चालणारी ही यात्रा यंदा सात दिवस चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने नियुक्त झालेल्या उत्सव समितीच्या अध्यक्षा सौ. अंजुमताई कांदे यांनी नागरिकांची संमती तसेच आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय जाहीर केला.
या निर्णयामुळे यात्रेचा विस्तार होणार असून अधिक भाविकांना सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे, या यात्रेत बचत गटातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या स्टॉलसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. त्यामुळे स्थानिक महिलांना व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय विविध खेळणी, पाळणे, दुकाने आणि इतर व्यावसायिक उपक्रमांसाठीही मुबलक जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यात्रेदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, ही यात्रा प्रत्येकाच्या घरातील उत्सवासारखी साजरी व्हावी, असे आवाहन अंजुमताई कांदे यांनी नागरिकांना केले आहे. तसेच चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने आमदार सुहास कांदे आणि अंजुमताई कांदे यांच्या वतीने माता एकवीरा देवीला सुमारे आठ किलो चांदीचे दागिने अर्पण करण्यात येणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली.
नांदगाव येथील माता एकवीरा देवी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ मानले जाते. त्यामुळे या यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व असून, नांदगावसह जिल्ह्यातील तसेच शेजारील तालुके व जिल्ह्यांतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
या वर्षीची यात्रा अधिक भव्य, दिव्य आणि सर्वसमावेशक स्वरूपात पार पडणार असल्याचे स्पष्ट संकेत या निर्णयातून मिळत आहेत.
या बैठकी प्रसंगी नगराध्यक्ष सागर हिरे माजी नगराध्यक्ष तसेच आजी-माजी नगरसेवक शहरातील सुजाण नागरिक पत्रकार आणि यात्रा उत्सव प्रेमी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते .



