नांदगाव आयटीआयमध्ये रोजगार महाकुंभ; ३०० हून अधिक उमेदवारांची नोंदणी
Nandgaon News

नांदगाव आयटीआयमध्ये रोजगार महाकुंभ; ३०० हून अधिक उमेदवारांची नोंदणी
पात्र उमेदवारांना जागेवरच ऑफर लेटर; नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून थेट मुलाखती
वेगवान मराठी; मारुती जगधने २९ August २०२६
नांदगाव : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ २०२६’ अंतर्गत नांदगाव येथील शहीद भगतसिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे मंगळवारी (दि. २९) भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
मुंबई येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात राज्यस्तरीय रोजगार महाकुंभाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत देशभरातील ८०० हून अधिक ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व ठिकाणच्या कार्यक्रमांचे आभासी उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
नांदगाव येथील रोजगार मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार सुनील सौंदाणे उपस्थित होते. संस्थेचे प्राचार्य योगेश फेकरीकर तसेच म.वि.प्र. आयटीआय, नांदगावचे प्राचार्य एच. बी. ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या परिसरातूनच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. महिंद्रा अँड महिंद्रा (नाशिक)चे एच.आर. अमोल एकनाथ देवरे, आर्म्स इंडिया प्रा. लि.चे चंद्रकांत खाडे, यूबी स्टेनलेस लि. (सिन्नर)चे साईनाथ भिंगारे, अमृत प्रबोधिनीचे अजिंक्य कुणाल, टाटा स्ट्राईव्हचे अमोल पवार आणि प्रांजली पैठणी (नांदगाव)चे कृष्णा सूर्यवंशी यांनी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या.
या रोजगार महाकुंभासाठी नांदगाव व परिसरातील ३०० हून अधिक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. यापैकी बहुतांश उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून, पात्र उमेदवारांना कंपनीच्या प्रतिनिधींच्या हस्ते जागेवरच ऑफर लेटर (नियुक्तीपत्र) प्रदान करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या दृष्टीने हा मेळावा मोठी संधी ठरला. अशा रोजगार मेळाव्यांचा युवकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य योगेश फेकरीकर यांनी केले.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील एम. डी. निकुंभ, सर्व निदेशक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. आर. मढवई यांनी केले.



