
वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला/ दिनांक: 6 सप्टेंबर: शेतकरी आता शेणखताच्या तुटवड्यामुळे मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करण्यास भाग पाडले जात आहेत. मागील काही वर्षांत यंत्रशक्तीच्या वाढत्या वापरामुळे पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात घटत चालली आहे. परिणामी, पूर्वी सहज उपलब्ध असलेले शेणखत आता दुरापास्त झाले असून शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने रासायनिक खत वापरावे लागत आहे.
शेणखत हे पारंपरिक सेंद्रिय खत असून जमिनीची सुपिकता टिकवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. चांगल्या कुजलेल्या शेणखतात ०.४% नत्र, ०.१५% स्फूरद आणि ०.५०% पालाश असते, जे पिकासाठी आवश्यक घटक पुरवते. परंतु पशुधन घटल्यामुळे शेणखताचा पुरवठा संकटात आला आहे. त्याऐवजी रासायनिक खतावर अवलंबित्व वाढल्याने जमिनीची पोत खालावत आहे आणि मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे.
शेतकऱ्यांनी रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खताचा वापर करण्याकडे वळावे, अशी शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. गोठयातील माती व मूत्र यांचा योग्य वापर करून नैसर्गिक खत तयार करता येते. तसेच माती परीक्षण करून जमिनीला आवश्यक घटकांचा अंदाज घेऊन ते प्रमाणित रित्या पुरविणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासह पर्यावरणस्नेही शेतीचा प्रचार होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



