महाराष्ट्र,देश

भऊरच्या शिरपेचात मानाचा तुरा; महावितरणचे संचालक राजेंद्र पवार जागतिक पातळीवरील ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित!

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : तालुक्यातील भऊर गावचे सुपुत्र आणि महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भऊर गावाच्या आणि महावितरणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत मानव संसाधन (HR) क्षेत्रातील त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर-२०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात जगभरातील सरकारी, औद्योगिक, शैक्षणिक व संशोधन संस्थांच्या समन्वयातून कार्यरत असलेल्या ‘ग्लोबल एनर्जी अँड एन्व्हायरमेंट फाउंडेशन’ (GEEF) च्या वतीने नवी दिल्ली येथे ‘जागतिक ऊर्जा नेतृत्व परिषद-२०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. ‘विकसित भारत आणि ऊर्जा सुरक्षितता’ या मुख्य विषयावर विचारमंथन झालेल्या या जागतिक परिषदेत भारतातील रशियन फेडरेशनचे उपायुक्त डॉ. एव्हगेनी ग्रिव्हा, आइसलँडचे राजदूत बेनेडिक्ट होस्कुल्डसन आणि नीती आयोगाचे माजी सदस्य डॉ. विजयकुमार सारस्वत यांच्या हस्ते राजेंद्र पवार यांना हा गौरवपूर्ण पुरस्कार सुपूर्द करण्यात आला. जागतिक पातळीवरील या मोठ्या सन्मानामुळे भऊर परिसरासह संपूर्ण राज्यभरातून राजेंद्र पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संचालक राजेंद्र पवार यांनी वीज क्षेत्रातील मनुष्यबळ विकासात अमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. महावितरणच्या तब्बल ८६ हजार कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि सव्वा तीन कोटी ग्राहकांची सेवा केंद्रस्थानी ठेवून त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. यामध्ये प्रामुख्याने विद्युत सुरक्षिततेसाठी जागतिक विक्रमी लोकसहभाग मिळवणे, कर्मचारी कल्याण व प्रोत्साहनपर धोरणे राबवणे, कामगार संघटनांसोबत सकारात्मक संवाद साधणे, आधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण देणे आणि मानव संसाधन व्यवस्थापनात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणे यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. यासोबतच महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान, सक्षमीकरण आणि कर्मचाऱ्यांना हरित ऊर्जेसाठी दिलेले प्रोत्साहन यासारखे अनेक कर्मचारी-हिताचे निर्णय त्यांनी व्यवस्थापनाच्या मंजुरीने अंमलात आणले.

राजेंद्र पवार यांनी विद्युत क्षेत्रात मनुष्यबळ विकासासाठी दिलेल्या याच अतुलनीय योगदानाचे आणि धोरणात्मक निर्णयांचे चोख मूल्यमापन ‘जीईईएफ’च्या जागतिक निवड समितीने केले. त्यानुसार या आंतरराष्ट्रीय परिषदेत स्वच्छ आणि हरित ऊर्जा तंत्रज्ञानाचा प्रसार करणाऱ्या जागतिक मंचावर त्यांची या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. भऊर सारख्या ग्रामीण भागातून गेलेल्या नेतृत्वाने थेट जागतिक स्तरावर मिळवलेला हा सन्मान महावितरणसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!