शेती

निफाड तालुक्यात अतिवृष्टीचा फटका ; तालुक्यातील ४४,२०७ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ३३ कोटी ८० लाख रुपयांची मदत वर्ग ; तांत्रिक अडचणींमुळे निफाडचे ५२९८ नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित

 

 

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.६नोव्हेंबर २०२५ :- निफाड तालुक्यात अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप सुरू झाले आहे, बाधित ५१ हजार शेतकऱ्यांपैकी तब्बल ५ हजार शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या सलग पावसामुळे निफाड तालुक्यातील शेतकरी अक्षरशः उघड्यावर आले आहेत. द्राक्षे, कांदा, मका, टोमॅटो यांसारख्या प्रमुख पिकांवर अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी शेतजमिनींमध्ये पाणी साचले, तर फळबागा निष्क्रिय झाल्या. अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्याने रब्बीच्या पेरणीही धोक्यात आली आहे. परिणामी, शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने सर्वेक्षण सुरू केले होते.
या पार्श्वभूमीवर, निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाईसाठी अर्ज दाखल केले. पंचनामे होऊन शेतकरी पोर्टलवर एकूण बाधित ५१,१७७ शेतकऱ्यांचे अर्ज अपलोड करण्यात आले आहेत. त्यापैकी प्रशासनाने पात्र ठरवलेल्या बाधित ४४,२०७ शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरित करण्यात आले आहे. वितरित झालेल्या या अनुदानाची एकूण रक्कम तब्बल ३३ कोटी ०८ लाख रुपये इतकी आहे.

अजूनही सुमारे ५,२९८ शेतकरी प्रतीक्षेत :-
तालुक्यातील उर्वरित ५,२९८ शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप प्रलंबित आहे. एकत्रित क्षेत्र,
ॲग्रीस्टॅक नसणे, काही प्रकरणांमध्ये जमीन नोंदणीतील विसंगती, बँक खात्याची माहिती अपूर्ण असणे, आधार पडताळणी न झाल्यामुळे वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. महसूल विभागाकडून या तांत्रिक त्रुटी दूर करून उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत लवकरात लवकर पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

अतिवृष्टीचा फटका सर्व पिकांना :-
निफाड तालुक्यातील प्रमुख पिकांपैकी द्राक्षेबागांना सर्वाधिक फटका बसला आहे. सलग पावसामुळे बागांमध्ये ओलसर वातावरण निर्माण झाले, त्यामुळे मुळकुज, पानगळ आणि बुरशीजन्य रोग वाढले. द्राक्षेवेली निष्क्रिय होऊन वांझ राहिल्या. कांदा रोपे, कांद्याचे पीकही मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले. मका आणि टोमॅटोची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही उत्पादनात घट जाणवली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेतीत गुंतवणूक केली होती, त्यामुळे नुकसानानंतर कर्जफेडीचे ओझे त्यांच्या खांद्यावर आले आहे. त्यामुळे निफाड सारख्या सधन तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारी अनुदानाची मदत तात्पुरता दिलासा देणारी असली, तरी शेतकऱ्यांचा प्रश्न केवळ एका हंगामापुरता नाही. बदलत्या हवामान पद्धतीमुळे दरवर्षी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपीट यांचा फटका बसतोच. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थिर व टिकाऊ मदतयोजना, जलसंधारण आणि हवामानानुकूल शेतीसाठी प्रशिक्षण देण्याची मागणीही होत आहे.

शेतकऱ्यांचा रोष आणि अपेक्षा :-
सर्वेक्षण योग्यरीत्या झाले नाही, अनेक शेतकरी मदतीसाठी प्रतीक्षेत आहेत. अर्ज करून तीन महिने झाले, पण खात्यात पैसे आले नाहीत. द्राक्षे हंगाम नसतांना सप्टेंबर मध्ये पंचनामे करून द्राक्षे उत्पादकांना तुटपुंजी मदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता हंगाम सुरू झाल्यावर प्रशासनाने फेर वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रशासनाची भूमिका :-
सर्व बाधित पात्र शेतकऱ्यांना मदत मिळेलच. काही अर्जांची पडताळणी प्रलंबित आहे, पण ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल. अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल दर आठवड्याला जिल्हा प्रशासनाकडे पाठवला जातो आणि शासनाकडून निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहे.
– विशाल नाईकवाडे
तहसीलदार, निफाड

निफाड तालुक्यातील महसूल, कृषी आणि पंचायत समिती कार्यालयांकडून एकत्रित प्रयत्न सुरू असून, शेतकऱ्यांचे दस्तऐवज तपासून अनुदान प्रक्रिया वेगाने पार पडावी, यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आम्ही रोज सकाळपासून रात्रीपर्यंत पडताळणी करत आहोत. उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
– सुधाकर पवार
तालुका कृषी अधिकारी

निफाड तालुक्यातील बाधित क्षेत्र :-
मका : ८४८५.१ हेक्टर
सोयाबीन : ७९०१.१ हेक्टर
कांदा : २८० हेक्टर
कांदा रोप : १०७ हेक्टर
टोमॅटो : १२५२ हेक्टर
भाजीपाला : ३६३ हेक्टर
डाळिंब : १७.९ हेक्टर
द्राक्ष ३५ एकर

 

 

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!