शेती

या जिल्ह्यात कांदा लागवडीचा परत जुगार शेतकऱ्यांची किमान ४ हजार रुपयांच्या भावाची अपेक्षा

या जिल्ह्यात कांदा लागवडीचा परत जुगार शेतकऱ्यांची किमान ४ हजार रुपयांच्या भावाची अपेक्षा

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला/ दिनांक: 24ऑगस्ट :नाशिक जिल्हा म्हणजेच देशाची कांद्याची राजधानी. तरीदेखील इथल्या शेतकऱ्यांसाठी कांदा हे पीक वर्षानुवर्षे जुगार ठरत आले आहे. “या वेळेस तरी कांदा दर देईल” या आशेवर शेतकरी मोठ्या प्रमाणावर लागवडीला जातात. मात्र दरांचा खेळ नेहमीच उलटाच ठरतो.

गेल्या वर्षीचा उन्हाळी कांदा सडून गेला

गेल्या वर्षीचा उन्हाळी कांदा अजूनही बाजारात तेजीत आलेलाच नाही. उलट शेतकऱ्यांच्या चाळीत ठेवलेला अर्ध्याहून अधिक कांदा सडून गेला. त्यामुळे झालेल्या तोट्याची भरपाई होण्यासाठी आताच्या कांद्याला किमान ४ हजार रुपयांचा दर मिळावा अशी अपेक्षा आहे. मात्र बाजारपेठेचे संकेत वेगळेच आहेत.

दक्षिणेतील रब्बी कांद्याची आवक

आताच्या घडीला दक्षिण भारतातील रब्बी कांद्याची आवक सुरू झाली असून त्यामुळे दर बेताचेच राहतील, असे जाणकार सांगत आहेत. झालेला खर्च कसाबसा निघतोय; पण नफा तर दूरच, तोटाही शेतकऱ्यांच्या पदरात पडतो.

वाढता खर्च, अनिश्चित दर

बियाणे, खते, कीटकनाशके व मजुरी यांचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय.

लागवडीपासून विक्रीपर्यंत कांद्याच्या दराची कुठलीही हमी नाही.

शेतकरी जास्त किंमतीच्या अपेक्षेने परत परत लागवड करतो; पण आवक वाढताच दर कोसळतात.

कांद्याचे तीन हंगाम

नाशिक जिल्ह्यात खरीप, रब्बी आणि उन्हाळा असे तीन हंगाम कांद्याचे घेतले जातात. त्यात पोळ कांदा, रांगडा कांदा यांच्याही लागवडी मोठ्या प्रमाणावर होतात. मात्र सर्व हंगामांमध्ये शेतकरी “जुगार”च खेळतो.

शेतकऱ्यांचे अनुभव

“गेल्या वर्षी उन्हाळी कांदा चाळीतच सडून गेला. यावेळी तरी भाव मिळेल या आशेने लागवड केली; पण आतापर्यंत काहीच खात्री वाटत नाही.” — दिनेश खैरनार शेतकरी, येवला

“खर्च दुप्पट झाला आहे, पण दर हमखास मिळेल याची खात्री नाही. शेवटी आम्ही कांदा लावतो, पण जिंकतो की हरतो हे बाजार ठरवतो.” — न्याणेश्वर भालेराव शेतकरी, सायगाव येवला

“४ हजार रुपये भाव मिळालाच तर काहीसा दिलासा मिळेल; नाहीतर परत बट्ट्याचाच सौदा ठरेल.” — गोकुळ (महेश) भालेराव शेतकरी, येवला

 

 

शेतकऱ्यांची अपेक्षा :-

यंदाही कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होणार आहे. पण हा खेळ पुन्हा बट्ट्याचा ठरू नये एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. स्थिर दर व किमान हमीभाव मिळाल्यासच शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळू शकेल.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!