शहरातील बांधवानी ग्रामीण जनतेचा आवाज बना – शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचे आवाहन
शहरातील बांधवानी ग्रामीण जनतेचा आवाज बना – शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचे आवाहन

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला, दि. 13 ऑगस्ट 2025 –
येवला तालुक्यातील ग्रामीण भाग आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तब्बल ८०४० कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येचा विचार करत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहरातील 200 विस्थापित गाळेधारकांच्या मागण्या मांडण्यासाठी येवले शहरातील नागरिक रस्त्यावर उतरले, त्यातील सर्वांना काही गाळा मिळणार नव्हता, पण सर्व जण एकत्र आले…
याउलट ग्रामीण शेतकऱ्यांना साधे निवेदन द्यायलाही येवला शहरात आणणे अवघड ठरते, अशी खंत शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी व्यक्त केली.
सोनवणे म्हणाले, “शहरातील लोकांनी ग्रामीण जनतेचा आवाज बनावे. सर्वपक्षीय कार्यकर्ते, व्यवसायिक, रिक्षा चालक-मालक, डॉक्टर, इंजिनियर, वकील, खासगी नोकर यांना माझे आवाहन आहे की, तालुक्यातील तमाम कर्जबाजारी शेतकऱ्यांसोबत उभे राहा. सरकार डोके मोजते – म्हणून आपले डोके शेतकऱ्यांसोबत जोडा.”
त्यांनी स्पष्ट केले की, शेवटी शेतकरीच हा शहरातील बाजारपेठेला चालना देणारा खरेदी-विक्रीचा प्रमुख घटक आहे. “शेतकरी वाचला तर शहर वाचेल” असे सांगून त्यांनी सर्वांनी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले.
*********



