शेती

लवकरच मांजरपाड्याचे पाणी डोंगरगावपर्यंत खळाळणार

लवकरच मांजरपाड्याचे पाणी डोंगरगावपर्यंत खळाळणार

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव

येवला :दिनांक: 31 जुलै 2025 :येवला तालुक्याचा उत्तर-पूर्व व उत्तर-पश्चिम भाग कायमच टंचाईग्रस्त राहिलेला आहे. या भागातील हजारो शेतकऱ्यांची 35 वर्षांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. देवसाने मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी लवकरच डोंगरगावपर्यंत पोहोचणार असून, दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा आणि पुणेगाव-दरसवाडी डावा कालवा या मार्गाने पाणी सोडण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आहेत.

‘चातकासारखी’ वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा

पूर्व भागात यंदाही समाधानकारक पावसाअभावी शेतकऱ्यांची स्थिती कठीण आहे. रिमझिम पावसावरच पिके तग धरून आहेत. मात्र नदी-नाले कोरडे, पाझर तलाव रिकामे, आणि साठवण बंधारे अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर मांजरपाड्याचे पाणी मिळणे म्हणजे जिवंत आशेचा लोंढाच!

मंत्री छगन भुजबळ यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा येवला हा मतदारसंघ. गेली अनेक वर्षे त्यांनी जलसिंचनासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. मांजरपाडा प्रकल्प त्यांच्या प्रयत्नातून साकार झाला असून, या अंतर्गत कालव्यांची वाहन क्षमता वाढवण्यात आली आहे. परिणामी, डोंगरगावसह संलग्न परिसरात पाणी पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कालव्यांवरील अडथळे आता टाळले जाणार – प्रशासन सजग

“गतवर्षी पाणी चाचणी दरम्यान काही असामाजिक घटकांनी कालवा फोडल्यामुळे पाणी टोकापर्यंत पोहोचू शकले नव्हते. यंदा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली असून कालव्यांवर विशेष नजर ठेवली जात आहे. कालवा अबाधित राहावा यासाठी गावकऱ्यांनी देखील सतर्क राहावं.”
— डॉ. मोहन शेलार, पाणी आंदोलकदरसवाडी धरण ८०% भरले, मात्र येवा अजून वाढण्यासाठी पावसाची गरज

सध्या दरसवाडी धरणात ८० टक्के पाणीसाठा असून, लवकरच पाणी सोडण्याच्या सूचना मंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र पूर्ण लाभक्षेत्रासाठी धरण किमान २००% भरावं लागेल.

“मागील वर्षी पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचले होते. यंदा सर्व बंधारे, पाझर तलाव तुडुंब भरतील अशी अपेक्षा आहे.पुढील काळात नव्या लिंक योजनांच्या माध्यमातून पूर्व भागाकडे अधिकचे पाणी वळवण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी मंत्री भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल.”
— भागवतराव सोनवणे, संयोजक, जलहक्क संघर्ष समिती, येवला

या प्रकल्पामुळे केवळ शेतीच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचीही समस्या कमी होण्याची शक्यता आहे. आता सर्वांच्या नजरा फक्त त्या खळाळत्या लोंढ्याकडे आहेत, जो आशेचे पाणी घेऊन येईल.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!