बीएसएनएलची सेवा सलग दुसऱ्या दिवशी ठप्प; ग्राहकांचे हाल
नांदगाव: मारुती जगधने
दि . १४ मार्च 2026
नांदगाव शहर आणि ग्रामीण भागात शनिवार, १४ मार्च रोजी सकाळपासूनच भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ची सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने ग्राहकांचे प्रचंड हाल झाले. नेटवर्क नसल्यामुळे बँकिंग व्यवहार, शासकीय कामे आणि वैयक्तिक संपर्क यंत्रणा कोलमडली असून, प्रशासकीय कामकाजावर याचा मोठा परिणाम दिसून आला.
नेमकी अडचण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळपासूनच मोबाईल टॉवर्सचे सिग्नल गायब झाले होते. काही ठिकाणी तांत्रिक बिघाड तर काही ठिकाणी केबल कापली गेल्याची प्राथमिक चर्चा आहे. विशेष म्हणजे, इंटरनेट सेवाही बंद असल्याने ऑनलाईन कामे करणाऱ्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
बँकिंग आणि ऑनलाईन सेवांना फटका
सध्या अनेक बँका आणि पतसंस्थांचे व्यवहार बीएसएनएलच्या लीज लाईनवर अवलंबून आहेत. नेटवर्क नसल्यामुळे ग्राहकांना तासनतास बँकेत ताटकळत उभे राहावे लागले. तसेच ‘डिजिटल इंडिया’च्या काळात साध्या ‘युपीआय’ पेमेंटसाठीही नागरिकांना इतर खासगी कंपन्यांच्या नेटवर्कचा आधार घ्यावा लागत आहे.
ग्राहकांमध्ये संताप
”बीएसएनएलकडून वारंवार अशा प्रकारे सेवा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तक्रार करूनही वेळेवर दखल घेतली जात नाही,” अशी संतप्त भावना नांदगावमधील स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. १४ मार्च रोजी सकाळपासून गेलेले नेटवर्क उशिरापर्यंत पूर्ववत झाले नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.



