महाराष्ट्र,देश

अवतार परिचयातून जीवनाचा मार्ग; त्याग, संयम आणि राष्ट्रभक्तीचा जागर” – आचार्य महंत प्रभाकर बाबा कपाटे

अवतार परिचयातून जीवनाचा मार्ग; त्याग, संयम आणि राष्ट्रभक्तीचा जागर” – आचार्य महंत प्रभाकर बाबा कपाटे

वेगवान मराठी : एकनाथ भालेराव

येवला (दि.16 मार्च) : येवला तालुक्यातील अंगुलगाव येथील माळावर जानराव वस्तीतील दत्तमंदिर यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय श्रीमद भागवत कथा सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी संपूर्ण परिसर भक्तिरसाने अक्षरशः न्हाऊन निघाला. आचार्य महंत प्रभाकर बाबा कपाटे यांच्या ओजस्वी, परखड आणि विचारप्रवर्तक निरूपणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या प्रभावी वाणीतील अध्यात्म, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रप्रेमाचा संगम ऐकून भाविकांच्या डोळ्यांत श्रद्धेची चमक दिसून आली.
कथेच्या तिसऱ्या दिवशी “अवतार परिचय” या विषयावर सखोल निरूपण करताना आचार्य महंत प्रभाकर बाबा कपाटे यांनी धर्म, समाज आणि मानवतेचा मर्म उलगडून सांगितला. “जिथे सुखसाधना आहे तिथे परमात्मा नसतो, पण जिथे दुःख आहे तिथे परमात्मा असतो,” असे सांगत त्यांनी जीवनातील संकटांना धैर्याने सामोरे जाण्याचा संदेश दिला. संकटे ही माणसाला घडवतात, तीच व्यक्तिमत्त्वाला परिपक्व करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकादशीचे महत्त्व सांगताना त्यांनी नामस्मरण, उपवास, सेवा आणि साधना यांचे महत्त्व पटवून दिले. “कलियुगात नामस्मरण हीच खरी साधना आहे; हरिनामातच मोक्षाचा मार्ग दडलेला आहे,” असे सांगत त्यांनी भाविकांना हरिनामाच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. श्रीकृष्ण आणि प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील प्रसंग सांगत त्यांनी जीवन कसे जगावे, संकटात धैर्य कसे ठेवावे आणि मृत्यूला देखील शांतपणे कसे सामोरे जावे याचे मार्गदर्शन केले.
समाजात वाढत चाललेल्या नैराश्याबद्दल बोलताना त्यांनी तरुणांना आत्महत्येसारख्या चुकीच्या मार्गापासून दूर राहण्याचे आवाहन केले. “तुम्ही कोणत्या देवाचे भक्त आहात हे महत्त्वाचे नाही; आपण सर्वप्रथम माणूस आहोत. समाज आणि राष्ट्रासाठी जगणे हीच खरी भक्ती आहे,” असे ते म्हणाले. मोबाईल आणि भौतिक सुखांच्या मागे धावताना तरुणांनी संस्कार आणि कुटुंबमूल्ये विसरू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करताना त्यांनी प्रत्येक स्त्रीमध्ये आईचे रूप पाहण्याचा संस्कारक्षम संदेश दिला. तसेच क्रांतिकारक राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव यांच्या बलिदानाची आठवण करून देत त्यांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची जाज्वल्य भावना जागवली. “भारत माता ही आपली आई आहे; तिच्यासाठी त्याग करण्याची तयारी प्रत्येक भारतीयाने ठेवली पाहिजे,” असे सांगत त्यांनी उपस्थितांकडून “वंदे मातरम्”चा घोष घडवून आणला.
कलियुगातील भौतिकतेच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, संपत्तीमुळे सुखसाधना मिळू शकतात; परंतु त्याग, संयम, साधना आणि सदाचाराशिवाय खरे समाधान मिळत नाही. काम, क्रोध, मत्सर आणि अहंकार या चार दोषांपासून दूर राहून नम्रतेने जीवन जगले तरच खऱ्या अर्थाने अध्यात्माची अनुभूती मिळते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी चक्रधर स्वामींच्या समतेच्या विचारांचा उल्लेख करत समाजात एकात्मता, बंधुता आणि धर्मरक्षणाची गरज अधोरेखित केली. “जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा परमेश्वर अवतार घेतो,” असे सांगत त्यांनी भागवत कथेत वर्णन केलेल्या दहा अवतारांचे महत्त्वही स्पष्ट केले. प्रत्येक अवतार हा मानवजातीला मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ आहे, असे त्यांनी नमूद केले.
या भक्तिमय आणि प्रेरणादायी कथेने उपस्थित भाविकांना अध्यात्मासोबतच सामाजिक जबाबदारी, राष्ट्रप्रेम आणि सदाचाराचा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ, महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण हरिनामाच्या गजराने,संगीतमय गजराने आणि “जय जय श्री कृष्ण हरी”च्या घोषाने भारावून गेले होते.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!