वसाका पुनरुज्जीवनासाठी निर्णायक बैठक ; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले सकारात्मक संकेत

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातील बंद पडलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना, विठेवाडी (ता. देवळा) पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने निर्णायक पाऊल टाकले गेले आहे. चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या बैठकीत कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक आर्थिक, प्रशासकीय आणि तांत्रिक उपायांवर चर्चा झाली.
कसमादे परिसराचे एकेकाळी आर्थिक वैभव असलेला हा कारखाना बंद असल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कर्मचारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुरू करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत आमदार डॉ. राहुल आहेर यांनी मांडले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीला संबंधित विभागांचे मंत्री, सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, बँक अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कारखान्याला पुन्हा उर्जितावस्था आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे सकारात्मक संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
या निर्णयामुळे कसमादे परिसरातील शेतीवर आधारित अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा गती मिळेल, असा विश्वास डॉ. राहुल आहेर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, “ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि परिसराच्या विकासासाठी हा कारखाना लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत राहीन.” या बैठकीमुळे कारखाना सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.



