महाराष्ट्र,देश

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री.मतोबा महाराजांच्या मूर्ती व दानपेटीची चोरी ; संतप्त ग्रामस्थांकडून नैताळे बंद ; पोलिसांना मिळाले हे अर्धे यश..

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दिनांक ३ डिसेंबर २०२५ :- नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री.मतोबा महाराजांच्या मूर्ती व दानपेटीची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. संतप्त ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने नैताळे बंद ठेऊन निषेध नोंदवला आहे.
आज दिनांक ३ डिसेंबर रोजी पहाटे २.४५ च्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी आतील दरवाजाची कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. श्री.मतोबा महाराजांच्या चांदीच्या सुमारे तीन किलो वजनाच्या दोन मूर्ती व दानपेटी चोरून नेली. पहाटेच्या सुमारास सदर चोरीची घटना पुजाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी सदर घटनेची माहिती देवस्थान ट्रस्टचे
अध्यक्ष नामदेव बोरगुडे व विश्वस्त मंडळास दिली. अध्यक्ष नामदेव बोरगुडे यांनी स्वतः निफाड पोलिस ठाण्यात जाऊन चोरीची तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता निफाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश गुरव टीमसह घटनास्थळी दाखल झाले. मंदिर व परिसरातील सी.सी.टी.व्ही फुटेज तपासले असता दोन युवकांनी चोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तातडीने नाशिक येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने गाव परिसर व धारणगाव रस्त्यापर्यंत दिशा दाखवली. श्वान पथकाच्या मदतीने आज दुपारी गावालगत असलेल्या गोविंदराव भवर यांच्या गट नंबर १६३ मधील शेतात असलेल्या विहीरीत रिकामी दानपेटी सापडली आहे. त्यानंतर फॉरेन्सिक टीमही तपासात सामील झाली.
सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व परिसरातील भाविक नैताळे येथे जमा झाले. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेऊन निषेध व्यक्त केला. जोपर्यंत पोलिस चोरट्यांना शोधून कठोर कारवाई करत नाहीत तोपर्यंत संपूर्ण नैताळे शहर स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेची माहीती मिळाल्याने निफाडचे आमदार दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, सागर पाटील कुंदे, निफाडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे, तलाठी शंकर खडांगळे, ग्रामविकास आधिकारी उज्वला भोईर यांनी घटनास्थळी भेट दिली. लाखो भाविकांच्या श्रद्धास्थानाचा असा अवमान सहन केला जाणार नाही असा इशारा देत ग्रामस्थांनी शांतता राखावी व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती आमदार दिलीप बनकर यांनी केली.
दरवर्षी पौष पोर्णिमेला येथे अखंड पंधरा दिवसांसाठी यात्रोत्सव भरतो. या कालखंडात लाखो भाविक श्री.मतोबा महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात, यात्रोत्सवासाठी अवघा एक महिना उरला असल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान ठाकले आहे.

चौकट :- श्री.मतोबा महाराज मंदिरातील चोरीची ही दुसरी घटना आहे. या अगोदर दिनांक १७ फेब्रुवारी २००१ रोजी चोरट्यांनी मतोबा महाराजांची चांदीची मूर्ती, दोन चांदीच्या लहान मूर्ती, चांदीचे दोन नाग, एक घोडा, पितळेची कालभैरव मूर्ती असा अडीच किलो चांदीचा ऐवज चोरून नेला होता. दि.१० जून रोजी अचानक गावाच्या दक्षिण बाजूस गोविंद सदू खरे यांच्या शेतात त्यांचे नातू महेंद्र भास्कर खरे हे शेतीची मशागत करत असतांना
प्लॅस्टिक कागदात गुंडाळलेली वस्तू वर आल्या. खरे यांनी प्लॅस्टिक कागद उचकून पाहिला असता त्यांना त्यात चोरीस गेलेली मतोबा महाराज मूर्ती दिसली.

चौकट :- श्री.मातोबा महाराज मूर्ती चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी शहर व परिसरात पूर्णपणे शांतता प्रस्थापित करून व्यावसायिकांनी स्वयंस्पूर्तीने संपूर्ण दुकाने बंद ठेऊन निषेध नोंदवला आहे. पोलिसांनी ग्रामस्थांच्या संयमाचा आदर करून तातडीने तपास करावा.
– राजेंद्र बोरगुडे
संचालक, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!