लासलगाव ग्रामीण रुग्णालयात वाद; वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पत्रकारासह चौघांविरुद्ध गुन्हा, तर रुग्णाच्या पालकाची नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांकडे चौकशीची मागणी
वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.१३ डिसेंबर २०२५ :- लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व रुग्णाच्या पालकांमध्ये झालेल्या वादातून परस्परविरोधी तक्रारी समोर आल्या असून या प्रकरणाने वादग्रस्त वळण घेतले आहे. एका बाजूला वैद्यकीय अधिकारी
व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी पत्रकारासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला रुग्णाच्या आईने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कथित अरेरावी व गैरवर्तनाविरोधात वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी डॉ.बाळकृष्ण पंढरीनाथ अहिरे, वैद्यकीय अधीक्षक (वर्ग १), ग्रामीण रुग्णालय लासलगाव यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, दि.२४ नोव्हें २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास तसेच दि.२७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ ते २ या वेळेत उपचार सुरू असताना कविता अरुण कुमावत यांनी, ‘ माझ्या मुलाला तपासत नाहीत, सलाईन – इंजेक्शन का देत नाहीत’ असे म्हणत आरडाओरडा केला. त्यानंतर त्यांनी महेश विश्वनाथ साळुंके, मोमीन व शहेजाद रफिक पठाण यांना रुग्णालयात बोलावून घेतले. या चौघांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत ‘तुम्हाला फुकटचा पगार आहे काय?’ अशा शब्दांत धमकावले, उपचार पद्धतीवर आक्षेप घेत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. रुग्णांच्या प्रकृतीनुसार उपचार केले जात असल्याचे समजावून सांगितले तरीही आरडाओरडा सुरूच ठेवण्यात आला. आरोपी सोनू पठाण हा यापूर्वीही रुग्णालयात येऊन कर्मचाऱ्यांना वारंवार धमकावत असल्याचेही म्हटले आहे. त्यांचे फिर्यादीवरून गु.र.नं. ८८६/२०२५, भा.न्या.सं.कलम २२१, ३५२, ३५१(२) व ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एस. आर. कदम तपास करीत आहेत.
दरम्यान, याच प्रकरणात पालक कविता अरुण कुमावत यांनी आरोग्य उपसंचालक, नाशिक यांच्याकडे स्वतंत्र तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यात त्यांचा १४ वर्षीय मुलगा सोहम याला तीव्र खोकल्याचा त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयानंतर आर्थिक परिस्थितीमुळे दि.२४ नोव्हेंबर रोजी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात एक्स – रे साठी नेण्यात आले. मात्र एक्स-रे मशीन बंद असल्याचे सांगण्यात आले. तरीही मुलाला दाखल करून दोन दिवस सलाईन देण्यात आली, मात्र सलाईनमधून इंजेक्शन न दिल्याने प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. दि.२७ नोव्हेंबर रोजी सलाईनमध्ये इंजेक्शन का दिले जात नाही? अशी विचारणा केल्यावर परिचारिकेने उंच आवाजात उत्तर दिले, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरून, ‘ रुग्णालयावर विश्वास नसेल तर येथे येऊ नका’ असे सांगत पोलिस बोलावण्याची धमकी दिली. पोलिसांसमोरच सलाईन वेगाने बंद करण्यात आल्याने मुलाला थंडी वाजून आली. कोणतीही चौकशी न करता आई व आजारी मुलाला पोलिस गाडीत बसवून पोलिस ठाण्यात नेऊन कोऱ्या कागदावर सही करून घेण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
रुग्णास योग्य उपचार मिळत नसल्याने संबंधित महिलेने पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. पत्रकाराने माहिती घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांचे सहाय्यक व अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वैद्यकीय सेवा सुरळीत करण्यात आली. त्यानंतर दि.९ डिसेंबर रोजी आरोग्य उपसंचालकांकडे तक्रार दिल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी दि.११ डिसेंबर रोजी आमच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आल्याचा आरोप पत्रकार महेश साळुंके यांनी केला आहे. या परस्परविरोधी तक्रारींमुळे लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील हे प्रकरण चर्चेचा विषय ठरले असून आता चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



