या जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी; शुक्रवारपासून अधूनमधून वीजसह सरींची शक्यता
Nandgaon News
- या जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी; शुक्रवारपासून अधूनमधून वीजसह सरींची शक्यता
वेगवान मराठी : मारुती जगधने
नाशिक | दि. १३ ऑक्टोबर २०२५
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरडे आणि उबदार हवामान सुरू असून, आज सकाळपासून आकाशात धुळकट वातावरण आणि हलकं धुके (हझी) दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत हलकं ते मध्यम पावसाचं प्रमाण दिसणार नाही.
तथापि, १७ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी काही काळ आकाश ढगाळ होऊन वीजसह हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान सामान्यतः धुकट सूर्यप्रकाश आणि उबदार राहणार आहे.
पावसाची शक्यता असलेले भाग
- जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसर, हरसूल, दुगांव, इगतपुरीसह डोंगराळ आणि पठारी भागात अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे.
- तर नाशिक शहर, नांदगाव, मनमाड, चांदवड, मालेगाव, सिन्नर या सपाट भागांत थेट पावसाची शक्यता कमी असली तरी, संध्याकाळी किंवा रात्री काही वेळेस ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते.
- सह्याद्री पर्वतरांगांमधील भागांमध्ये अधूनमधून ढगफुटी स्वरूपाचा अल्पकालीन पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्याचे हवामान
सध्या नाशिक जिल्ह्यात दिवसाचे तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान असून, रात्रीचे किमान तापमान १८ ते २० अंशांपर्यंत आहे. वातावरण धुकट आणि थोडेसे कोरडे असून, सकाळच्या सत्रात हलकी धूळ व धुके जाणवते.
शेतीसाठी सूचना
हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकांना आवश्यक तशी पाणीपुरवठा योजना तयार ठेवावी. तसेच शुक्रवारपासून वीजसह पावसाची शक्यता लक्षात घेऊन तयार पिकांची कापणी शक्य असल्यास लवकर करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १७ ऑक्टोबरनंतर हवामानात थोडी बदलाची चिन्हे दिसत असली तरी मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज अद्याप नाही.



