- या गावात उघड्या वीजतारा – नागरिकांच्या जिवाला धोका
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव दिनांक 25 ऑगस्ट 2025
टाकळी बुद्रुक ता . नांदगाव येथे वीज वितरण कंपनीचे उघडे रोहित (वीज पॅनल/बॉक्स) अनेक दिवसांपासून दुर्लक्षित अवस्थेत पडलेले आहेत. या रोहितमधून वीजपुरवठा करणाऱ्या तारा पूर्णपणे जिवंत असून उघड्यावर लटकत आहेत.
विशेष म्हणजे, याच ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा व अंगणवाडी आहे. तसेच गावाला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने येथे नेहमीच नागरिकांची रहदारी असते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा याकडे लक्ष वेधूनही संबंधित वीज वितरण विभागाने दुरुस्ती करण्यास कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत तातडीने उपाययोजना करून सुरक्षित वीजपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थ व पालकांनी केली आहे. अन्यथा गंभीर अपघात घडल्यास याची जबाबदारी वीज वितरण कंपनीवर राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
मुख्य मागणी :
उघड्या रोहितला तातडीने झाकण बसवणे.
जिवंत तारांची सुरक्षित मांडणी करणे.
शाळा परिसरातील वीजजोडणी व्यवस्थित करणे.



