नाशिक ग्रामीण

कौटुंबिक वादातून सख्ख्या साल्याकडून मेव्हण्याचा कुऱ्हाडीने वार करून खून!

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : बहिणीला नांदवत नाही आणि तिच्या आजारावर उपचार करत नाही, या रागातून सख्ख्या साल्याने आपल्या मेव्हण्याचा कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना देवळा तालुक्यात घडली आहे. प्रकाश रुपेश गांगुर्डे (वय ३१, रा. सरस्वती वाडी, ता. देवळा) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी समाधान भावसा पवार (रा. खालप, ता. देवळा) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रकाश गांगुर्डे यांची पत्नी मनोरुग्ण असल्याने त्यांच्यात घरगुती वाद होते. पत्नीला नीट वागवत नाही आणि तिच्यावर दवाखान्याचा खर्च करत नाही, या कारणावरून संशयित आरोपी समाधान पवार याच्या मनात मेव्हण्याबद्दल तीव्र राग होता.
रविवारी, १० मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास प्रकाश गांगुर्डे हे खालप-मेशी रस्त्यावरील सिमेंटच्या पुलावर मोबाईलवर बोलत उभे होते. यावेळी समाधान पवार याने पाठीमागून येऊन प्रकाश यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने जोरदार वार केले. हा वार इतका भीषण होता की, प्रकाश गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा केल्यापासून आरोपी समाधान पवार हा फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी देवळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक रवाना झाले आहे. या घटनेमुळे देवळा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे करीत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी सापळा रचला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!