महाराष्ट्र,देश

श्रेयस भामरेची राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत ‘सुवर्ण’ झेप!

वेगवान नाशिक / बाबा पवार
सटाणा : चंदीगड येथील सुकना लेकवर पार पडलेल्या ‘ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी रोइंग चॅम्पियनशिप’ मध्ये सटाणा येथील सुपुत्र कु. श्रेयस (टुडू) दीपक भामरे याने रोइंग (नौकानयन) क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावून बागलाण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तगड्या विद्यापीठांच्या आव्हानावर मात करत श्रेयसने मिळवलेले हे यश युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

केरळ आणि पंजाबच्या संघांना चारली धूळ
५ मे ते १० मे दरम्यान चंदीगड (पंजाब) येथे ही राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशभरातील नामांकित विद्यापीठांचे खेळाडू सहभागी झाले होते. अंतिम फेरीत श्रेयसने आपल्या कौशल्याच्या जोरावर रोइंगमधील बलाढ्य मानल्या जाणाऱ्या केरळ युनिव्हर्सिटी आणि जीएनडीयू (GNDU) युनिव्हर्सिटीच्या स्पर्धकांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

अष्टपैलू खेळाडू आणि खडतर सराव

श्रेयस हा मूळचा पिंपळकोठे (ता. बागलाण) येथील असून सध्या त्याचे कुटुंबीय सटाणा येथे स्थायिक आहेत. नाशिकच्या के.टी.एच.एम. कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या श्रेयसने कॉलेजच्या बोट क्लबवर आपला सराव पूर्ण केला. विशेष म्हणजे, कोणत्याही अधिकृत प्रशिक्षकाचे (कोच) मार्गदर्शन उपलब्ध नसताना केवळ स्वतःच्या जिद्दीवर आणि मेहनतीवर त्याने राष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवले आहे.

“क्रीडा क्षेत्रातील अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या श्रेयसची दैदिप्यमान कारकीर्द :  श्रेयस हा अष्टपैलू खेळाडू असून त्याने यापूर्वी स्केटिंगमध्ये ३ राज्यस्तरीय व १ राष्ट्रीय, पोहण्यात १ राज्यस्तरीय, तर वॉटरपोलोमध्ये १ राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. रोइंगमधील ही त्याची तिसरी राष्ट्रीय स्पर्धा होती.

यशात कुटुंबाचा आणि मावशीचा मोलाचा वाटा ; श्रेयसच्या या यशामागे त्याचे वडील दीपक बाजीराव भामरे, आई कल्पना भामरे यांचा खंबीर पाठिंबा आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना श्रेयसने विशेषतः आपली मावशी विजया शिंदे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाचा आणि सहकार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. “स्वतःवर असलेला विश्वास आणि घरच्यांकडून मिळालेले प्रोत्साहन यामुळेच मी हे सुवर्णपदक जिंकू शकलो,” अशी भावना त्याने व्यक्त केली.

पुढील ध्येय: खेलो इंडिया
या राष्ट्रीय सुवर्णपदक  विजयानंतर श्रेयसचे ध्येय आता खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’  आहे. आगामी काळात या स्पर्धेतही सुवर्ण यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे त्याचे ध्येय आहे. श्रेयसच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पिंपळकोठे आणि सटाणा परिसरातून त्याचे भरभरून अभिनंदन होत आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!